
लॉकडाऊननंतर वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात लोक रस्त्यावर आल्याची घटना ताजी असतानाच काही तासांनीच टेम्पोतून उत्तर प्रदेशला जाऊ पाहणाऱया 25 कामगारांना सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. त्या सर्वांची जामिनावर सुटका केली.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला. लॉकडाऊननंतर मंगळवारी दुपारी काही जण हे वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात जमले होते. या घटनेनंतर काही तासांनीच सांताक्रूझ परिसरातील 26 जण टेम्पोने उत्तर प्रदेशला जाण्याच्या तयारीत होते. मंगळवारी रात्री सांताक्रूझ पोलिसांनी मीरा बाग परिसरात नाकाबंदी लावली होती. नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एक टेम्पो दिसला. त्या टेम्पोमध्ये 25 कामगार बसले होते. त्या सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून अटक केली. कामगारांना दीड हजार रुपयात उत्तर प्रदेशला नेले जात होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.
























































