
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये, मकोका अंतर्गत कारागृहात वाल्मिक कराडचे नवनवीन कारनामे आता समोर आले आहेत. संतोष देशमुख खटल्यातून दोषमुक्त करावे याकरता वाल्मिक कराडने दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. सदर अर्ज फेटाळून लावत, विशेष मकोका न्यायालयाने असे निरीक्षण नोदंवलेले आहे की, सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच होता.
वाल्मिक कराडने दोष मुक्तीसाठी बीड न्यायालयामध्ये वकिलांच्या मार्फत अर्ज सादर केला होता. परंतु आता मकोका न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणामध्ये, काही महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वाल्मिक कराडवर तब्बल 20 हून अधिक, गुन्ह्यांची नोंदही यावेळी निरीक्षणांतर्गत मांडण्यात आली आहेत. तसेच गेल्या 10 वर्षांमध्ये 7 गंभीर स्वरुपाचे गुन्हेही दाखल असल्याचे निरीक्षणातून सांगण्यात आले आहे.
याबरोबरच वाल्मिक कराड हाच टोळीचा म्होरक्या असून, तो घटनेचा मुख्य सूत्रधार आहे असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. वाल्मिक कराडकडून आवादा एनर्जी प्रकल्प चालकाला धमक्या देणे यासारखे अनेक गुन्हे आहेत. याच गोष्टी नजरेसमोर ठेवून महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधाराने वाल्मिक कराड दोषी नसल्याचे निरीक्षण मकोका न्यायालयाने नोंदवले आहे.
वाल्मिक कराडने केलेल्या दोष मुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर, आता त्याचे वकिल उच्च न्यायालयात दाद मागणार असे सांगण्यात येत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (22 जुलै) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली होती. या सुनावणीत वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. आता या प्रकरणातील पुढची सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.