
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही फेटाळला. या गुह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे पाहता जामीन देणे योग्य नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
खंडणीला विरोध केला म्हणून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे गेल्या वर्षी अपहरण करून अतिशय अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात परळीचे अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांचा जीवश्च पंठश्च वाल्मीक कराडसह सात जणांना मकोका लावण्यात आला. वाल्मीक कराड हाच या कटाचा सूत्रधार असल्याचे तपास यंत्रणांनी समोर आणले. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मीक कराडने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडताना अॅड. अमरजितसिंग गिरासे यांनी कराड हाच हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पुराव्यानिशी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हत्याकांडाचे सर्व व्हिडीओ न्यायालयात सादर करण्यात आले.
वाल्मीक कराडच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. शिरीष गुप्ते यांनी अटक करताना लेखी कारणे देण्यात आली नसल्याचा दावा केला. मकोका लावण्याचा निर्णयही चुकीचा असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी वाल्मीक कराड हा घटनास्थळापासून शेकडो किमी दूर होता, त्याचा या गुह्याशी कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र न्या. एस. एम. घोडेस्वार यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. ठोस पुराव्यांच्या आधारे वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्या. घोडेस्वार यांनी स्पष्ट केले.
आरोप निश्चितीपर्यंतही स्थगिती नाही
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचे वकील सत्यव्रत जोशी यांनी या प्रकरणातील आरोप निश्चिती 19 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. हत्या प्रकरणातील काही आरोपींनी दोषमुक्तीसाठी केलेले अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तोपर्यंत वाल्मीक कराडच्या दोषनिश्चितीला स्थगिती देण्याची विनंती खंडपीठाला केली, परंतु खंडपीठाने ती अमान्य केली.





























































