
नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी आणि पालिकेचा बहुतांशी कारभार चालणाऱया ‘सॅप’ संगणकीय प्रणालीचा गेल्या तीन महिन्यांपासून गोंधळ सुरू असल्याने विकासकामांना फटका बसला आहे. त्यामुळे या वर्षी नगरसेवक निधी वापराचा मार्चपर्यंतचा कालावधी वाढवावा अशी मागणी शिवसनेने केली आहे.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचा फटका काही विकासकामांना बसला असताना गेल्या तीन महिन्यांपासून ‘सॅप’ प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे प्रभागांमधील विकास अनेक कामे रखडली आहेत. सॅप प्रणाली दुरुस्तीनंतर अद्याप पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने विकासकामांच्या निविदाही काढता येत नाहीत. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबविण्यातच अडचणी येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. कोविडमुळे सुरुवातील कामे रखडली. आता सॅपच्या गोंधळामुळे कामे होत नाहीत, असे राजुल पटेल म्हणाल्या. यावेळी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.



























































