पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला जोडे उचलायला लावले, शोएब अख्तरसह फॅन्स संतापले

1199

दीर्घ कालावधीनंतर क्रिकेट सामने पुन्हा सुरू झाले असून पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सध्या कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पाकिस्तानच्या क्रिकेटरसिकांनी जे काही पाहिलं त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्यांनी जे काही पाहिलं त्यानंतर त्यांनी पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक मिसबाह उल हक याची शाब्दीक धुलाई करायला सुरुवात केली आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद याला पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघात घेतलं नाहीये. त्याच्या जागी मोहम्मद रिझवान याला संधी देण्यात आली आहे. 12 वा खेळाडू असल्याने सर्फराजवर मैदानातील खेळाडूंना पाणी देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्फराज पाण्यासह फलंदाजांसाठी बूटही हातात धरून नेताना दिसल्याने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींचं टाळकं सटकलंय.

सर्फराज अहमद याला खेळाडूंसाठी बूट,पाणी नेण्यासाठी पाठवणं हे अपमानजनक असल्याची प्रतिक्रिया काही क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे. हे काम दुसरा ज्युनिअर खेळाडूही करू शकला असता, सर्फराजला हे काम का दिलं ? असा प्रश्न त्याचे चाहते विचारत आहेत.

चहूबाजूने टीका व्हायला लागल्यानंतर प्रशिक्षक मिसबाह उल हक याने म्हटलंय की ‘ही सामान्य बाब आहे आणि मला वाटत नाही की यामुळे सर्फराजला काही आपत्तीजनक वाटत असेल. मी कर्णधार असताना एका सामन्यात मी खेळलो नव्हतो, मी 12 वा खेळाडू असल्याने मीच पाणी घेऊन मैदानात गेलो होतो.’ असंही तो म्हणाला. मिसबाह उल हकने असल्या विषयांवर चर्चा फक्त पाकिस्तानतच होऊ शकतात असं म्हणत टीकाकारांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा मैदानात पाणी नेण्याची वेळ आली तेव्हा इतर ज्युनिअर खेळाडू हे नेटमध्ये सराव करत होते आणि एकटा सर्फराज हाच तिथे उपलब्ध होता, त्यानेही मनाचा मोठेपणा दाखवून बूट आणि पाणी मैदानात नेले असं मिसबाहने म्हटलंय. सर्फराजला वॉटरबॉय बनवल्याने नाराज फॅन्सना पाकिस्तानमधल्याच काही क्रिकेटप्रेमींनी आठवण करून दिली की विराट कोहली, न्यूझीलंडचा केन विल्यमसन हे देखील त्यांच्या खेळाडूंसाठी मैदानात पाणी घेऊन गेले होते

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने सर्फराजला पाणी,जोडे घेऊन मैदानात जाताना पाहून नाराजी व्यक्त केली आहे. 4 वर्ष संघाचे नेतृत्व केलेल्या आणि पाकिस्तानला चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूसोबत असं वागणं बरोबर नाही असं शोएबने म्हटलंय. तुम्ही त्याला बूटही न्यायला लावलेत, हे योग्य नसून त्याने स्वत: जर हे केलं असेल तर तुम्हाला त्याला थांबवायला हवं होतं, माझ्यासाठी वसिम अक्रम याने कधीही बूट आणले नव्हते. असे शोएब अख्तरने म्हटले आहे.

शोएबने या निमित्ताने पुन्हा एकदा सर्फराजवर आगपाखड केली आहे. या घटनेमुळे सर्फराज हा किती दुबळा, कमजोर आहे हे दिसून येतं असं तो म्हणाला. त्याने जसे बूट नेले तसेच संघाचे नेतृत्वही केले, यामुळेच मिकी आर्थर यांनी त्याला धाकात ठेवले असं शोएबने म्हटलंय. बूट नेण्यास माझी हरकत नाही,मात्र माजी कर्णधाराने ते नेणं योग्य नाही असं शोएब म्हणालाय.

2019च्या विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानकडून पुन्हा एकदा सपाटून मार खाल्ल्यानंतर सर्फराजला कर्णधार पदावरून दूर करण्यात आलं होतं. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशिद लतिफ म्हणाला की सर्फराजने जे केलं त्यावरून तो मनाने किती मोठा आहे हे दिसून येतंय. संघातील इतर वरिष्ठ खेळाडू हे ट्रॅक सूटमध्ये फिरताना दिसत होते. सर्फराज मात्र त्याच्या खेळाप्रती समर्पित वाटला.

आपली प्रतिक्रिया द्या