अनवट वाटा – ‘भावपूर्ण’ बूंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. सरिता विनय भावे

राजस्थान राज्य अतुलनीय पराक्रम आणि अतीव दर्जाची भावपूर्णता यासाठी नेहमीच नावाजले जाते. भावपूर्णतेचा विचार केला तर संत मीराबाईचे विषप्राशन, पन्नादाईचे अभूतपूर्व बलिदान, महाराणा प्रतापाच्या चेतक घोडय़ाची उडी यासारख्या कथा सर्वश्रुत आहेत. राजस्थानातील ‘बूंदी’ शहराची ओळख करून घेताना तिथल्या महत्त्वाच्या दोन प्रेक्षणीय स्थळांची आणि त्यांच्या उभारणीमागील सखोल भावनांची ही ओळख.

आपल्या देशातील राजस्थान राज्य अतुलनीय पराक्रम आणि अतीव दर्जाची भावपूर्णता यासाठी नेहमीच नावाजले जाते. भावपूर्णतेचा विचार केला तर संत मीराबाईचे विषप्राशन, पन्नादाईचे अभूतपूर्व बलिदान, महाराणा प्रतापाच्या चेतक घोडय़ाची उडी यासारख्या कथा सर्वश्रुत आहेत. या सदरातील मागील भागात आपण राजस्थानातील ‘बूंदी’ शहराची ओळख करून घेतली होती. या भागात आपण ‘बूंदी’ शहरातील दोन प्रेक्षणीय स्थळांची आणि त्यांच्या उभारणीमागील सखोल भावनांची ओळख करून घेऊया. फोटोग्राफीची आवड असणाऱया पर्यटकांना आपली सर्व हौस भागवता येईल इतक्या त्या अप्रतिम आहेत, हे आधीच स्पष्ट केलेले बरे!

यातील पहिली जागा आहे, ‘रानीजी की बावडी.’ सतराव्या शतकात (1699) बांधलेली, बूंदी शहराच्या भरवस्तीत असलेली ही बाव ‘क्वीन्स स्टेपवेल’ या नावाने पर्यटकांमध्ये सुप्रसिद्ध आहे. राव राजा अनिरुद्ध सिंह यांची दुसरी पत्नी राणी नाथावती यांच्याकडे ही बाव बांधण्याचे श्रेय जाते. यामागची हकीकत अशी सांगितली जाते की, पहिल्या पत्नीला मूलबाळ न झाल्याने राजाने राणी नाथावती यांच्याशी दुसरा विवाह केला. परंतु जेव्हा राणी नाथावती यांना मुलगा झाला तेव्हा प्रथेनुसार लालनपालन करण्यासाठी त्यांना आपल्या बाळाला थोरल्या राणीकडे सुपूर्द करावे लागले. बाळाशी झालेल्या ताटातुटीमुळे भावनिकरीत्या कोलमडून पडलेल्या राणी नाथावती यांनी मन रमवण्यासाठी स्वतःला प्रजेच्या सेवेच्या कामात झोकून दिले. बूंदीत त्यांनी बांधलेल्या वीस विहिरींमध्ये ही सगळ्यात विशेष आहे.

देखणेपणात ही जयपूरजवळील ‘आभानेरी’ येथील ‘चाँद बावडी’ व गुजरातमधील ‘पाटण’ येथील ‘रानीनी वाव’ यांच्या बरोबरीने मानली जाते. त्यांच्यापेक्षा हिचे स्थापत्य मात्र अतिशय भिन्न आहे. नजीकच्या काळात पक्ष्यांच्या त्रासापासून संरक्षण करण्यासाठी ही बाव अर्धपारदर्शक आवरणाने आच्छादित केलेली आहे. 46 मीटर (150 फूट) खोली असलेल्या या बावीचा सरळसोट इंग्रजी ‘आय’ अक्षरासारखा आकार, तीन मजले आणि दोन प्रवेशद्वारांच्या अतिशय कलासक्त पद्धतीने सजवलेल्या कमानी या खासियत आहेत. या बावीच्या नुसत्या पायऱया बघणेसुद्धा नेत्रसुखद आहे! दोन्ही मजल्यांवर विहिरींच्या दोन्ही बाजूला भैरव, गजेंद्र, गणेश, सरस्वती आणि श्रीविष्णूंच्या दशावतारांना समर्पित छोटी छोटी मंदिरे कोरलेली आहेत. तोरणसदृश कमानीवर केलेले हत्तींचे खोदकाम तर अप्रतिम आहे. हे सुंदर कोरीवकाम या विहिरीला ‘सर्वोत्तम सजलेली विहीर’ हा मान मिळवून देतात. ‘भारतीय पुरातत्त्व खात्या’च्या अंतर्गत ‘संरक्षित स्मारक’ असलेली ही पायविहीर डिसेंबर 2021 मध्ये भारतीय पोस्ट खात्याने तिकिटावर अंकित करून नावाजली होती.

‘रानीजी की बावडी’पासून 2 कि. मी. अंतरावर असलेले ‘चौरासी खंभों की छत्री’ हे बूंदी शहरातील दुसरे महत्त्वाचे ‘संरक्षित स्मारक’ आहे. बूंदी साम्राज्याचे महाराज राव राजा अनिरुद्ध सिंह यांनी ते लहान असताना त्यांचा अतिशय प्रेमाने सांभाळ करणाऱया त्यांच्या दायीचा मुलगा, त्यांचा मानलेला भाऊ ‘देवा’ याच्या सन्मानार्थ सतराव्या शतकात (1683) या छत्रीची उभारणी केली होती. पिवळ्या वालुकाश्माने बांधलेल्या या दोन मजली स्मारकात एका उंच चौरसाकृती उंचवटय़ावर एक भव्य शिवलिंग स्थापलेले असून वरचे कोरीव काम केलेले छत 84 खांबांनी तोलून धरले आहे. इतिहासतज्ञांच्या मते सनातन धर्मात मोक्षप्राप्ती होण्याअगोदर जन्म-मृत्यूचा फेरा पार कराव्या लागणाऱया 84 लक्ष योनी दर्शविण्यासाठी या 84 खांबांची रचना केलेली आहे. एकदा मोजावयास सुरुवात केली तर सर्व 84 खांब मोजले न जाता काहीतरी चूक होते अशी याबाबतीत एक वदंता आहे! वेगवेगळ्या कोनांतून बघितल्यावर सर्व खांबांचे आणि एकूणच बांधकामाचे सौंदर्य अतिशय दिलखेचक वाटते. फुललेल्या कमलपुष्पासारख्या दिसणाऱया या प्रेक्षणीय छत्रीभोवती सुंदर उद्यान वाटिका विकसित केल्यामुळे तर फारच प्रसन्न वाटते.

जीवनदायिनी ‘रानीजी की बावडी’ आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ‘चौरासी खंभों की छत्री’ या जागा नेहमीच्या राजस्थानच्या राजपूत स्त्र्यां च्या सुन्न करणाऱया ‘जोहार’च्या कथांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वेगळ्याच अर्थाने भावनावश करतात.

[email protected]