
सर्जेकोट बंदरात मासेमारी नौकेला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत नौकेचे सुमारे 6 लाखाचे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
नितीन नारायण परुळेकर यांची कृष्णछाया ही नौका समुद्रातून मासेमारी करून मंगळवारी सकाळी सर्जेकोट बंदरात आली होती. एका खलाश्याची तब्बेत ठीक नसल्याने नौका बंदरात उभी अन्य खलाशांनी त्याला रुग्णालयात नेले. या दरम्यान समुद्रात उभी असलेल्या नौकेला आग लागली. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र नौकेचे मोठे नुकसान झाले आहे. नौकेचे केबिन, फिशहोल पेटी, नौकेचा मागचा भाग व अन्य साहित्य असे मिळून एकूण 6 लाख 10 हजारांचे नुकसान झाले आहे.
मत्स्य प्रशासनाच्या वतीने दुर्घघटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. जळालेल्या बोटीवरील जाळी व अन्य साहित्य किनाऱ्यावर आणण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते.

























































