सरोगसी प्रकरणात चार डॉक्टरांसह ६ जणांवर गुन्हा

24

सामना प्रतिनिधी । नागपूर

आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून त्यांना सरोगसी मदर बनविल्यानंतर त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी ४ डॉक्टरांसह ६ जणांवर गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. दर्शना पवार, डॉ. वर्षा ढवळे, मनीष सूरजरतन मुंदडा आणि हर्षा मनीष मुंदडा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून पोलिसांनी मुंदडा दाम्पत्याला अटक केली आहे.

अपत्य नसणाऱ्या दाम्पत्यांना मुंदडा पती-पत्नी अपत्यप्राप्तीचे आश्वासन देत होते. त्यासाठी त्यांच्याकडून ते लाखो रुपये उकळायचे. त्यानंतर सरोगसी मदरसाठी ते गोरगरीब आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना हेरायचे. त्या महिलांना सरोगसी मदर होण्यासाठी विविध प्रलोभने दाखवली जात होती. त्या महिलांना अडीच ते पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन मुंदडा दाम्पत्य द्यायचे. सरोगसीसाठी महिला तयार व्हाव्यात म्हणून त्या महिलांना सर्व सुखसुविधा, आरोग्य सेवा ते पुरवत होते. सरोगसी मदर बनण्यासाठी महिलेने होकार दिल्यावर आणि महिला गर्भवती राहिल्यावर सुदृढ मूल जन्माला येण्यासाठी या महिलांना दरमहा १० हजार रुपये देण्यात येत होते. बाळंतपण झाल्यानंतर पूर्ण पैसे देऊ असे या महिलांना सांगण्यात येत होते. बाळंतपण झाल्यानंतर मूल ताब्यात घेऊन आरोपी त्या महिलांना हाकलून देत असत. महिलांनी पैशासाठी तगादा लावल्यास त्यांना शिवीगाळ करून धमक्या देण्यात येत होत्या.

या आरोपींनी नंदनवन हद्दीत राहणाऱ्या एका महिलेसह इतर महिलांची १४ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने नंदनवन पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून मुंदडा दाम्पत्याला अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आपली प्रतिक्रिया द्या