सरकारी भूखंडावर घर बांधले, अलिबागमधील शेकापचा सरपंच अपात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

सरपंचपदाचा गैरवापर करून सरकारी जागेत अतिक्रमण केलेले घर परस्पर विक्री केल्याचे प्रकरण अलिबागच्या शिरवली येथील शेकापच्या सरपंचाला भोवले. या प्रकारामुळे शिरवली ग्रामपंचायतीचे सरंपच प्रमोद ठाकूर, सदस्या प्रीती ठाकूर व सदस्य मदन म्हात्रे यांना रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले असून अवघ्या 20 दिवसांवर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शेकापला हा मोठा झटका बसला आहे.

अलिबागच्या शिरवली येथील ग्रामस्थ शाम घरत व मनोज म्हात्रे यांनी सरपंच प्रमोद ठाकूर यांच्या विरोधात तहसीलदारांकडे तक्रार केली होती. ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या सार्वजनिक मालकीच्या जमिनीमध्ये बेकायदा घर बांधून त्याची विक्री केल्याने तहसीलदारांनी त्यांना नोटीस बजावली होती. तसेच दंडही आकारण्यात आला असल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी अर्जदारांनी केली होती. विवाद अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर ठाकूर यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सरंपच ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या ठाकूर व ग्रामपंचायत सदस्य म्हात्रे यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले. ऑक्टोबर 2017 मध्ये ठाकूर हे थेट सरपंच म्हणून शेकापकडून निकडून आले होते.