पाच हजाराची लाच स्विकारली; महिला सरपंचाच्या पतीला रंगेहाथ पकडले

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात तिर्थवाडी येथील महिला सरपंचाच्या पतीने 5 हजार रुपयांची लाच स्विकारल्याची घटना घडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. चाकूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चाकूर तालुक्यातील मौजे तिर्थवाडी येथील महिला सरपंच यांचे पती राजकुमार महालिंग शेटे यांनी तक्रारदार यांना एमआरजीएस अंतर्गत शेतात सिंचन विहीर मंजूर करुन देतो, असे सांगत 7 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 5,000 रुपये आता आणि उर्वरीत 2000 रुपये काम झाल्यावर घेण्याचे मान्य केले. त्यानुसार चाकूर येथील विजय जनरल ॲन्ड गिफ्ट सेंटर येथे बुधवारी 5000 रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार दराडे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या