
पावसचे सरपंच संदीप शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.याहल्ल्यात संदीप शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गणपती विसर्जनाच्या मिरवणूकी प्रसंगी गुरूवार सायंकाळी ही घटना घडली.
गुरववाडी ते फडकेवाडी दरम्यान निघालेली गणपती विसर्जन मिरवणूक पाहत राकेश नागवेकर (रा.गणेशगुळे) उभा होता. मिरवणूक पुढे जाताच त्याने कोयता हातात घेऊन संदीप शिंदेच्या दिशेने धाव घेत ”आज तुला संपवतो, आज तुझा शेवटचा दिवस” असे म्हणत त्याच्या अंगावर कोयतीने हल्ला केला. सुदैवाने हल्ला संदीप शिंदे यांनी राकेशचा हात पकडत हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संदीप शिंदे यांच्या हाताला दुखापत होऊन ते जखमी झाले.
हल्लेखोर राकेश नागवेकरने जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी रात्रीपासून राकेशचा शोध सुरू केला पुढील काही तासातच त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. राकेश नागवेकर हा तडीपार गुंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





























































