
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत (सारथी) अनियमितता झाल्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यावर या संस्थेच्या कारभाराची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. मंत्रिमंडळ बैठकीत यावर एकवाक्यता झाली असून या प्रकरणी लवकरच चौकशीला सुरुवात होणार आहे.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेची जबाबदारी सचिव जे.पी. गुप्ता यांच्याकडे गेल्यानंतर संस्थेत अनियमितता असल्याचे सांगत अनेक निर्णय त्यांनी रद्द केले होते. मराठा समाजाने यावरून आंदोलन केले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथे या प्रश्नावरून उपोषणही केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन जे.पी. गुप्ता यांना या पदावरून हटवण्याची घोषणाही केली होती.






























































