मूर्तीवर शिक्का मारण्याच्या अटीमुळे आस्थेला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशमूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे की पर्यावरणपूरक-शाडूची हे समजण्यासाठी मूर्तीच्या मागील बाजूस अनुक्रमे ‘लाल’ किंवा ‘हिरवी’ खूण करण्याच्या अटीमुळे भाविकांच्या आस्थेला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे भाविकांमधून तीक्र संताप व्यक्त होत असून ही अट रद्द करावी, अशी मागणी घरगुतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात येत आहे. ‘पीओपी’ किंवा पर्यावरणपूरक मूर्ती ओळखण्यासाठी इतर पर्याय शोधावा, अशी मागणीही भाविकांमधून करण्यात येत आहे.

सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या आठवडय़ावर आल्यामुळे तयारीसाठी मंडळांसह घरगुती उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. मंडळांच्या भव्य मूर्ती मंडपाकडे रवाना होत आहेत. शिवाय घरगुती उत्सवाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. असे असताना पालिकेच्या एका अटीमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आता पालकमंत्र्यांकडूनच आयुक्तांना पत्र

भाविकांमध्ये वाढलेला रोष पाहता हा निर्णय बदलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, असे पत्र लोढा यांनी प्रशासक आयुक्त इकबालसिंह चहल यांना दिले आहे.

पालिकेचा निर्णय पोहचला नसल्याने संभ्रम

मूर्तीवर खूण करण्याचा निर्णय प्रशासनाकडून रद्द करण्याचा निर्णय याआधीच घेतला असल्याची माहिती उपायुक्त रमाकांत  बिरादार यांनी दिली. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी झाली नसल्याने भाविकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. या निर्णयाला मूर्तिकारांकडूनही विरोध करण्यात आला होता.

कशामुळे पडली वादाची ठिणगी?

पालिकेने याआधी जाहीर केलेल्या अटीनुसार घरगुती उत्सवासाठी चार फुटांचीच शाडूची मूर्ती असावी आणि या मूर्तीच्या मागे हिरवी खूण करावी, असे निर्देश देण्यात आले होते. पालिकेच्या पथकाकडून घरोघरी जाऊन मूर्तीची पाहणी करण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र यानंतर घरगुती उत्सवासाठीदेखील a‘पीओपी’च्या मूर्तीला परवानगी देण्यात येत असल्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

गणेश मूर्ती पूजन हा भाविकांच्या आस्थेचा विषय असल्यामुळे  पूजन होणाऱ्या सात्विक मूर्तीवर खूण करणे, शिक्का मारल्यास हिंदूंच्या भावना दुखावू शकतात. त्यामुळे शिक्का मारण्याची अट योग्य नाही- नरेश दहिबावकर, अध्यक्ष, समन्वय समिती