सातार्‍यात सुरूरजवळ उभ्या ट्रकला झायलोची धडक; दोन युवकांचा जागीच मृत्यू

टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला झायलो कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात झायलोमधील दोन युवक जागीच ठार झाले, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर गावाजवळ उड्डाणपुलावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली.

अजय राजेंद्र सुतार (वय 26), केदार दत्तात्रय वेल्हाळ (वय 25, दोघेही रा. मसूर) हे दोघेजण जागीच ठार झाले, तर कारमधील सुजित रामचंद्र आवटे (वय 42, रा. रुक्मिणीनगर, कराड), अशोक शिवाजी कांबळे (वय 35, रा. कणसे मळा, वाघेरी, ता. कराड) हे दोघेजण गंभीर जखमी झाले.

काल रात्री उशिरा बंगळुरूच्या दिशेने निघालेला मालट्रक पुढचा टायर फुटल्याने सुरूर येथील उड्डाणपुलावर बाजूला उभा होता. रात्री पाऊणच्या सुमारास पुण्याहून मसूरकडे निघालेली झायलो कार या मालट्रकला पाठीमागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती, की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघातामुळे पुणे ते कोल्हापूर लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच जोशी विहीर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक एस. के. पोवार व त्यांचे कर्मचारी तसेच भुईंजच्या पोलीस कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना सातारला हलवले.  भुईंज पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या