
दौंड तालुक्यातील पाटस येथील कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या 11 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह मुलीला तिच्या आईने व मामाने आरोग्य कर्मचाऱयांची नजर चुकवून दुचाकीवर बसवित कोविड सेंटरमधून पळवून नेले. ही बाब एका आरोग्य सेविकेच्या लक्षात आली. तिने कोविड प्रशासनास याबाबत माहिती दिली. तोपर्यंत आरोग्य सेवकाने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने दुचाकीवरुन तिघांचा पाठलाग करत अर्ध्या तासांत त्यांना पकडले. त्यानंतर तिघांनाही कोविड सेंटरमध्ये माघारी आणण्यात आले. तिघांचीही कोरोना चाचणी केली असता आईचा कोरोना तपासणी अहवाल हा पाझिटिव्ह आला, तर मामाचा निगेटिव्ह आला. या सगळ्या प्रकारामुळे आरोग्य विभागाची पुरती धांदल उडाली. तर या कोवीड सेंटरच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. हा प्रकार आज सकाळी घडला.
































































