
राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण (नॅस) करण्यात आले होते. आता त्याच धरतीवर मार्च महिन्यात राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (स्लॅस) प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा 383 शाळांचा सहभाग राहणार आहे.
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावर भर देण्यात आला. सार्वत्रिकीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे पटनोंदणी, उपस्थिती टिकवून धरणे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली, तरी गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. शिक्षणाची गुणवत्ता ठरवणारे अनेक घटक असले तरी विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादणुकीचा स्तर हा महत्त्वाचा घटक आहे. तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे स्लॅसचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण मराठी माध्यमाच्या प्रथम भाषा मराठी व गणित या विषयांचे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 383 शाळांमध्ये स्लॅस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने निवडण्यात आलेला शाळेचा पट, माध्यमांची पडताळणी करून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व संबंधित तालुका समन्वयकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची तपासणी होणार
राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (स्लॅस) मध्ये आठवी, पाचवी, तिसरीच्या वर्गासाठी भाषा विषय आणि गणित यासंबंधी विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासले जाणार आहे. विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेणे तसेच समजून घेतलेल्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. सर्वेक्षणात जिल्हा परिषद, शासकीय व सरकारी अनुदानप्राप्त शाळा सहभागी होणार आहेत.






















































