
सातारा जिह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कराड तालुक्यात राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या आघाडीचे निर्विवाद वर्चस्व दिसून आले आहे. तर, जिह्यात अन्यत्र मतदारांनी संमिश्र कौल दिला.
कराडमध्ये पाटील गटाचे वर्चस्व
कराड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींमध्ये कराड उत्तरमध्ये सर्व आठही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली गटाने मुसंडी मारत विरोधकांना चारीमुंडय़ा चीत केले. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलचा चारपैकी तीन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकला आहे. केवळ एक ग्रामपंचायतीमध्ये भाजपला यश आले आहे. रेठरे बुद्रूकमध्ये डॉ. अतुल भोसले यांच्या आघाडीने सत्ता कायम राखली.
पाटणमध्ये संमिश्र यश
पाटण तालुक्यात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व मिंधे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटातील पारंपरिक लढतीत दोन्ही गटांना संमिश्र यश मिळाले. फलटण तालुक्यात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटांना संमिश्र यश मिळाले. एका ग्रामपंचायतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची सत्ता आली.
कोरेगावात सत्तांतराचे वारे
कोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर नाटय़ घडले. एकूण 10 ग्रामंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत मिंधे गटाचे आमदार शिंदे यांच्या ताब्यातील आसरे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सत्तांतर घडविले. तर चांदवडी व वेलंग, चवणेश्वर गावची सत्ता कायम ठेवली. तर मिंधे गटाचे आमदार शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली तडवळे (स) कोरेगाव, भाटमवाडी, शिरढोण, बोबडेवाडी या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. उर्वरित कन्हेरखेड, बोरिव, चोर्गेवाडी, कोंबडवाडी गावांची निवडणूक बिनविरोध झाली.
खटावमधील बुधमध्ये चुरशीची लढत
तालुक्यातील बहुचर्चित बुध येथील चौरंगी लढतीत माजी सरपंच अभयराजे घाटगे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी जनशक्ती विकास पॅनेलने सरपंचपदासह अकरा जागा जिंकत सत्ता कायम ठेवली. विरोधी लोकसेवा विकास पॅनेलला तीन जागा मिळाल्या. काटेवाडी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱयांना सरपंचपदाअभावी झटका बसला. सत्ताधारी श्री मानाप्पा ग्रामविकास पॅनेलला चार जागा मिळाल्या. विरोधी युवाशक्ती परिवर्तन पॅनेलला तीन जागा मिळाल्या. सरपंचपदाच्या उमेदवारांना समान मते मिळाल्याने नशीब चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये युवाशक्ती परिवर्तन पॅनेलकडे सरपंचपद मिळाले. नवलेवाडीच्या सरपंचपदी रोहिणी पवार विजयी झाल्या. निढळ येथील पोटनिवडणुकीत संगीता श्रीकांत खुस्पे विजयी झाल्या. त्रिमली येथील पोटनिवडणुकीत उदय यादव विजयी झाले.
वाईत आमदार पाटील गटाचे वर्चस्व
वाई तालुक्यातील पकड मजबूत ठेवण्यात आमदार मकरंद पाटील यांना यश आले असून, 16 पैकी 11 ग्रामपंचायतीत पाटील गटाने गड राखला आहे. तर शहाबाग व वेळे या दोन ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता मिळविली. पाचवड ग्रामपंचायतीत सरपंच पाटील गटाचा, तर सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. चांदवडी ग्रामपंचायतीत आमदार गटाच्या सरपंच फरिदा शेख बिनविरोध विजयी झाल्या. दोन ग्रामपंचायतीत मदन भोसले गटाने बाजी मारली आहे. पाचवडमध्ये सरपंचपद पाटील गटाला असले तरीही सर्व सदस्य भाजपचे निवडून आलेले आहेत. यशवंतनगर ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच एक मतांनी पराभूत झाला. शहाबाग ग्रामपंचायतीवर भाजपने परिवर्तन केले. वेळे माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांचे गाव तरीही मदन भोसले गटाने स्थानिक पक्षांशी युती करून एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे.


























































