सातारा जिल्ह्यातून दोनजण तडीपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहर तसेच शाहूपुरीत अनेक गंभीर स्वरूपाच्या गुह्यात सहभाग असलेल्या गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखास तसेच त्याच्या साथीदारास सातारा जिल्हा हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख ऋतिक जितेंद्र शिंदे (वय 23, रा. 251 गोडोली, सातारा), टोळी सदस्य अक्षय उर्फ बॉम्बे सुनील जाधव (वय 28, रा. बसाप्पा पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

गर्दी, मारामारी, आदेशाचा भंग करणे, दुखापत करणे, सशस्त्र दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे शरीराविरुद्धचे व मालमत्तेचे गंभीर गुन्हे करणाऱया या संशयितांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. त्याची चौकशी व सुनावणी होऊन जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी तडीपारीचा आदेश बजावला.

या टोळीतील लोकांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्हा पोलीसप्रमुखांचे दीडशतक

जिल्हा पोलीसप्रमुख बन्सल यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून 49 प्रस्तावांतील बेकायदेशीर कारवाया करणाऱया 151 इसमांना हद्दपारीचे आदेश केले आहेत. याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाई&क प्रमोद सावंत, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला.