
राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा विभागाच्या भरारी पथकाने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोव्याहून राजस्थानकडे नेला जात असलेला गोवा बनावटीचा विदेशी दारूचा प्रचंड मोठा साठा पकडला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ट्रकसह 53 लाख रुपयांच्या विदेशी दारूच्या 180 मिलीच्या तब्बल 36 हजार बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मुकेश मोहनलाल सिसोदिया (वय 39, रा. खजुरिया, ता. हातोड, जि. इंदूर, मध्य प्रदेश) व जितेंद्र भरतसिंग राठोड (वय 36, रा. मेथवाडा, ता. डेपालपूर, जि. इंदूर, मध्य प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप व संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय उपायुक्त डॉ. एच. बी. तडवी व सातारा विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने काल खोडद (जि. सातारा) गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल राजपुरोहितसमोर आयशर ट्रकमधून गोव्यावरून राजस्थानला निघालेला मद्यसाठा पकडला. या कारवाईत 180 मिलीच्या विदेशी दारूच्या 36 हजार बाटल्या (750 बॉक्स), आयशर ट्रक, दोन मोबाईल, दारूचे बॉक्स लपविण्यासाठी वापरलेल्या काजूच्या टरफलांच्या 47 गोण्या यांसह 53 लाख 29 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत प्रभारी निरीक्षक एन. पी. क्षीरसागर, निरीक्षक संजय साळवी, दुय्यम निरीक्षक किरण बिरादार, रोहित माने, महेश मोहिते, नितीन जाधव, सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम, भीमराव माळी, विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनी भाग घेतला होता.


































































