साताऱयातील जान्हवीचा विश्वविक्रम, सलग 8 तास 13 मिनिटे 21 सेकंद स्थिर राहून केले सुप्त बद्ध कोनासन

साताऱयातील जान्हवी इंगळे या तरुणीने सलग आठ तास 13 मिनिटे आणि 21 सेकंद स्थिर राहून सुप्त बद्ध कोनासन केले आहे. तिच्या या कामगिरीची नोंद योग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. नुकतेच तिला त्यांच्याकडून सुवर्ण पदक, प्रशस्तिपत्र आणि बॅच होल्डर प्राप्त झाले आहे. योग विश्वातील जान्हवीचा हा तिसरा विश्वविक्रम असून तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जान्हवी सध्या आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योग टीचर म्हणून कार्यरत आहे. इतरांना योगाचे धडे देत असताना स्वतःच्या शरीराची क्षमता तपासून पाहावी असा विचार तिच्या मनात आला. सर्वप्रथम तिने 13 सप्टेंबर 2020 साली सलग 5 तास 1 मिनिट आणि 17 सेकंद स्थिर राहून सिद्धासन केले. हा तिचा पहिला विश्वविक्रम होता. त्यानंतर महिला दिनी नऊवारी साडीमध्ये 1 तास 19 मिनिटे आणि 34 सेकंदामध्ये दहा हजार वेळा तितली क्रिया करून दुसरा विश्वविक्रम रचला. 21 मार्च 2021 मध्ये तिने सलग 8 तास 13 मिनिटे आणि 21 सेकंद स्थिर राहून सुप्त बद्ध कोनासन केले आहे. नुकतेच तिला प्रशस्तिपत्र आणि सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.

कोरोनाकाळात जपली सामाजिक बांधिलकी

जान्हवीने गेल्या दीड वर्षात कोरोना रुग्ण, होम क्वारंटाईन, आयसोलेट पेशंट यांच्यासाठी मोफत योग वर्ग घेतले. दहा हजारांहून अधिक जणांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले. या कार्याची दखल घेत लंडन बुक ऑफ रेकॉर्डने तिचा कमिटमेंट सर्टिफिकेट देऊन गौरव केला. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील 400 मुलींना तिने मोफत योग प्रशिक्षण दिले आहे.

योग विश्वातील माझ्या कामगिरीची तिसऱयांदा जागतिक स्तरावर दखल घेतली गेली याचा आनंद होतोय. शरीर तंदुरुस्त आणि मन शांत ठेवायचे असेल तर योगासने आणि मेडिटेशन करणे आवश्यक आहे. तुम्हाला ज्या ऍक्टिव्हीटीमध्ये रस आहे ती तुम्ही करा, पण त्याला योगासने आणि मेडिटेशनची जोड द्या. – जान्हवी इंगळे