भैरवगडच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सातारा

माळीणसारख्याच महाभयंकर दुर्घटनेच्या वाटेवर असलेल्या सातारा तालुक्यातील भैरवगड येथील भयभीत ग्रामस्थांना शनिवारी शिवसेनेच्या धडाकेबाज कार्यशैलीचा प्रत्यय आला.

शिवसेना नेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तत्काळ धाव घेऊन भैरवगडवर येणाऱ्या आपत्तीची कहाणी गावकऱ्यांकडून समजून घेतली. त्यानंतर राज्याचे पुनर्वसन सचिव निंबाळकर यांना भीतीच्या छायेखाली वावरत असलेल्या गावकऱ्यांसाठी तत्काळ निवारा कॅम्प सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सातारच्या दक्षिणेला डोंगरात वसलेल्या भैरवगड या छोटय़ाशा गावावर सध्या माळीणसारखे महाभयानक संकट काळ बनून घोंघावत आहे. हा डोंगर खचू लागल्याने गाव पुरते गाडले जाण्याच्या मार्गावर आहे. याची माहिती मिळताच शिवसेना नेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवसेना उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासमवेत भैरवगडला धाव घेतली.

राज्यातील इतर बाधित गावे
सातारा-118 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती – 9 हजार 221), ठाणे- 25 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती -13 हजार 104), पुणे- 108 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती – 13 हजार 500), नाशिक-5 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती – 3 हजार 894), पालघर-58 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती – 2 हजार), रत्नागिरी- 12 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-687), रायगड-70 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती – 3 हजार), सिंधुदुर्ग – 18गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-490). असे एकूण कोल्हापूर शहरासह 69 बाधित तालुके, तर 761 गावे आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीला गणेश मंडळे धावली
सांगली-कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गणेशोत्सव समन्वय समितीचे ऍड. नरेश दहीबावकर यांनी सांगितले. दरम्यान, आपत्तीग्रस्तांना मोठय़ा प्रमाणात मदत करावी, असे आवाहन समन्वय समितीच्या विनोद घोसाळकर यांनी केले आहे.

हजारो मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई सुमारे 11 हजार गणेश मंडळे आहेत. या मंडळांकडून मुंबईसह राज्यात कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदत करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व मंडळांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला हजारो मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे नरेश दहीबावकर यांनी सांगितले.

शिर्डी संस्थानकडून 10 कोटींची मदत
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यातील पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हाकरे यांनी दिली. संबंधित जिह्यांमधील पूरस्थिती पाहून वैद्यकीय पथक आणि औषधेही पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

बालगोपाळ मंडळाकडून 11111 हजारांची मदत
पूरग्रस्तांसाठी काळाचौकी अभ्युदयनगर येथील बालगोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाने तत्काळ 11111 रुपयांची मदत जाहीर केली आहे. शिवाय गणेशोत्सवादरम्यान ज्या भाविकांना पूरग्रस्तांना मदत करायाची आहे त्यांनी मंडळाच्या सभागृहामधील दानपेटीमध्ये आपल्या नावासह मदत जमा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.