साताऱ्याच्या तरुणीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी, मृत्यूनंतर अवयवदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे भीषण अपघातात जखमी झालेल्या साताऱ्याच्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. नीलम तानाजी शिंदे असे मयत तरुण नाव असून अपघातानंतर ती गेले 14 महिने कोमात होती. नीलमच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर तिचे अवयव दान करुन कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

नीलम शिंदे ही गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती. 14 फेब्रुवारी 2024 रोजी कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने नीलमला धडक दिली. तिच्या डोक्याला, हाता-पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर नीलमवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि ती कोमात गेली.

अखेर प्रकृती खालावल्याने तिची लाईफ सपोर्ट यंत्रणा काढून टाकण्यात आली. यानंतर तिचे निधन झाले. बुधवारी अमेरिकेतच हिंदू धर्मशास्त्रानुसार नीलमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नीलमने जिवंत असतानाच अवयवदानाचा संकल्प केला होता. त्यामुळे मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान केले.