आपत्कालीन परिस्थितीची नागरिकांना मिळणार माहिती, कोल्हापुरात पब्लिक ऍड्रेस सिस्टीम यंत्रणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापूर, अतिवृष्टी, भूकंप आदी आपत्कालीन आणि आणीबाणी प्रसंगी नागरिकांना सतर्क करण्यासह जनजागृती करण्यासाठी शहरासह जिह्यात 650 ठिकाणी सार्वजनिक सूचना देणारी पब्लिक ऍड्रेस सिस्टीम बसविण्यात येत आहे. देशात अशा प्रकारची ही पहिलीच सिस्टीम असल्याचा दावा कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने काही सूचना तसेच सावध करायचे असल्यास सध्या कोणतीही यंत्रणा नाही. अतिवृष्टी, महापूर, आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाला नागरिकांशी थेट संवाद साधून योग्य माहिती पोहोचवण्यासाठी पब्लिक ऍड्रेस सिस्टीम उपयोगी ठरणार आहे. कोल्हापूर जिह्यात 650, तर शहरात 60 ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱया-खोटय़ा माहितीचा प्रसार झपाटय़ाने केला जातो. त्याचे चांगले, वाईट परिणाम समाजात दिसून येतात. अशा वेळी नेमकी खरी माहिती काय आहे हे समजत नाही. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचविण्यासाठी मदत होणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.