
सामना ऑनलाईन, मुंबई
जनसंवाद आणि पत्रकारितेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची परीक्षा एप्रिल २०१८मध्ये पार पडली. या परीक्षेमध्ये साठ्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जबरदस्त यश संपादन केलं आहे. या कॉलेजची ऐश्वर्या प्रभुखानोलकर हिने विद्यापीठातून पहिला क्रमांक पटकावला आहे तर दुसरा क्रमांक साठ्येच्याच बाळकृष्ण आईर याने मिळवला आहे. बाळकृष्ण आईर हा विद्यार्थी BMM या पदवी अभ्यासक्रमाअंतर्गतही विद्यापीठातून प्रथम आला होता. महाविद्यालयातील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नृत्य, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांमध्येही या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश मिळवलं आहे.
मुंबई विद्यापीठाअंतर्गत मराठीतून जनसंवाद आणि पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण देणारे साठ्ये महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. या विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळे नक्कीच मराठी भाषेतील माध्यम शिक्षणाला चालना मिळेल व पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल असा आशावाद साठ्ये महाविद्यालयाचे माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा यांनी व्यक्त केला. साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे आणि उपप्राचार्य डॉ. मिलिंद जोशी यांनी यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठाचे संवाद आणि पत्रकारितेचे विभाग प्रमुख डॉ. संजय रानडे यांचे विशेष मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले होते




























































