
>> वैद्य सत्यव्रत नानल
चहा… आपल्या संस्कृतीमध्ये परदेशातून आलेला एक प्रकार, जो आज अविभाज्य घटक बनला आहे. इंग्रजांची भेट, सकाळचे तर्पण, अमृततुल्य अशा अनेक प्रकारे लोक त्याकडे पाहतात. चहाचे फायदे आज जाणून घेऊ या.
चहा उकळताना त्यात आले, काळी मिरी, दालचिनी, चहाचा मसाला, गवती चहा, वेलची असे प्रकार घालण्याच्या अनेक प्रथा आहेत. ‘इलायची वाली चाय’, ‘अदरख वाली स्पेशल चाय’ असले प्रकार सर्वांनी नियमित पिण्याचे नाहीत. चहाचा मसाला बारा महिने फक्त थंड हवेच्या ठिकाणी चालतो. गरम वातावरणात चहाचा मसाला नियमित वापरल्याने आम्लपित्त, उष्णतेचे रोग, रक्ताचे रोग, अंगावर पह्ड येणे, पुरळ येणे असे अनेक त्रास निर्माण होतात.
सध्या अनेक कंपन्यांचे तुळस, अश्वगंधा वगैरे घातलेले चहा बाजारात मिळतात. सध्या आयुर्वेदाच्या नावाखाली काहीही विकायची सर्वांना सवय झाली आहे, भावही जास्त घेता येतो. वास्तविक पाहता याचा फायदा किती होतो याबद्दल न बोललेलेच बरे. सुज्ञ वाचकांना त्याबद्दल वेगळे सांगायची गरज नाही. त्यात मिंट, तुळस या नावाखाली रासायनिक फ्लेवर फक्त लावलेले असतात हे वेगळे सांगायला नको. सकाळची सुरुवात असो किंवा दुपारचा आळस घालवायचा असो, रासायनिक पदार्थांचा वापर करून हे करणे अयोग्यच. अन्न, द्रव सर्व गोष्टी ताज्याच वापरणे सर्वात उत्तम असते. त्यामुळे असे पदार्थ वेगळे घालून चहा केला तर ठीक, अन्यथा नको. त्यातही असे कोणतेही पदार्थ चहाबरोबर जातात का, विरोधी तर ठरत नाहीत ना? हेसुद्धा आपापल्या वैद्यांना विचारून घेणे जास्त चांगले. चहाचे गुण आणि अश्वगंधा किंवा तुळस किंवा अजून काही एकत्र जात नसेल तर फायदे नाहीत, पण नुकसान नक्कीच होऊ शकते. स्वतःहून विकतचे दुखणे कुणीही कधीही ओढवून घेऊ नये.
प्रत्येक गोष्ट तपासून घ्या
हर्बल टी नावाने गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ बाजारात धुमाकूळ घातलेला आहे. यातही आजकाल कुणीही उठतो आणि कोणतीही वनस्पती पाण्यात घालून चहा किंवा फांटप्रमाणे बनवून पित सुटतो. एकमेकांना सांगून सवयी लावतो. सध्या गोकर्ण फुलांचा असाच बाजारात बोलबाला आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे ते समजून घेऊन मगच आपण काय वापरावे ते ठरवावे आणि तेवढेच नेमकेपणाने करावे. ऊठसूट काहीही ट्रेण्ड फॉलो करत बसू नये हे आवर्जून सांगायची वेळ आली आहे. हिंदीमध्ये म्हण आहे, ‘हर चमकने वाली चीज सोना नही होती,’ त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला आयुर्वेदिक म्हणून मार्पेट केले जात असताना वाचकांनी सुज्ञता दाखवून खरंच ते आयुर्वेदिक आहे का, हे आधी पहावे. म्हणजे प्रत्येक आयुर्वेदीय नावाने विकली जाणारी गोष्ट आयुर्वेदीय नसते हे खरे आहे.
आता यापुढे आपल्याला आवडतो तसा फक्कड चहा बनवताना आणि पिताना तो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे की नाही हे आधी पहा आणि मगच त्याचे फुरके ओढा. म्हणजे स्वस्थ जीवनाचा आनंद नेमकेपणाने तुम्हाला सर्वांनाही घेता येईल.
चहा कधी पिऊ नये
रिकाम्यापोटी चहा पिऊ नये.
जेवल्यावर लगेच पिऊ नये.
आम्लपित्त, रक्तपित्त असलेल्यांनी पिऊ नये.
शुक्रधातू नाश असेल तर जास्त पिऊ नये.
पाळीच्या दिवसांत स्राव जास्त होत असेल तर चहाचा मसाला, आले, काळी मिरी, दालचिनी, लवंग घालून पिऊ नये. स्राव कमी होत असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने प्यायला हरकत नाही.
फक्त दुधाचा चहा उकळून बनवून पिऊ नये.
चहामध्ये दुधाची मलई घालून उकळू नये. मलई घालायची असेल तर नंतर वरून घालावी. चहाचा कडू आणि कोरडेपणा कमी करून मलई पचून पोषण होण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
साखर, गूळ, दूध वगैरे गरजेपेक्षा जास्त घालून पिऊ नये.
चहाचे फायदे
काळा आणि दुधाचा चहा मनास तरतरी देतो, आळस घालवतो.
साखरेशिवायचा चहा तोंडाची चव सुधारतो. जीभ साफ करतो.
साखरेसोबतचा चहा थकवा कमी करतो.
थोडे दूध आणि साखरेसोबतचा चहा मनास उभारी देतो. जास्त प्यायला तर आम्लपित्त करतो.
इतर काही पैलू
चहाप्रमाणेच, परंतु चहाव्यतिरिक्त इतर पदार्थ वापरून चहासारखे बनवून आपल्या गरजेप्रमाणे वापरणे हे सर्वात व्यावहारिक ठरते. जसे ज्यांना लघवीला जळजळ, युरिन इन्फेक्शन, किडनीचे त्रास वारंवार होतात त्यांनी चहापत्तीऐवजी धणे आणि जिरे वापरून फांट करावा आणि नियमित प्यावा.




























































