हिंदुस्थानात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची सौदी अरेबियाची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा आर्थिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे सौदी अरेबिया हिंदुस्थानात सुमारे 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. हिंदुस्थानात गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी असल्याने तेल, नैसर्गिक वायू, आणि तेल उत्खनन क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी आणि गुतंवणूक करण्यासाठी सौदी विचार करत असल्याचे सौदी अरोबियाचे राजदूत डॉ. सऊद बिन मोहम्मद अल साती यांनी सांगितले. सौदीच्या या निर्णयाने पाकिस्तानला दणका बसला आहे. सौदीने गुंतवणुकीसाठी पाकिस्तानऐवजी हिंदुस्थानला प्राधान्य दिल्याने त्यांचा तिळपापड झाला आहे.

इंधन, संशोधन, पेट्रो रसायन, पायाभूत सुविधा, कृषी, खनिज आणि उत्खनन या सारख्या क्षेत्रात सौदी हिंदुस्थानात सुमारे 100 अब्ज डॉलरची गुतंवणूक करण्याची तयारी करत आहे. सौदीतील सर्वात मोठी तेल कंपनी अरामको आणि हिंदुस्थानातील रिलायन्स इंडस्ट्री यांच्यातील प्रस्तावित भागीदारीमुळे दोन्ही देशातील उर्जा संबंध अधिक दृढ होणार आहेत. तेल पुरवठा, कच्च्या इंधनावर प्रक्रिया, पेट्रोरसायन या क्षेत्रात अरामकोचा गुंतवणुकीचा विचार म्हणजे म्हणजे कंपनीच्या जागतिक बाजारातील विस्ताराची योजना असल्याचे सांगण्यात आले. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या ‘विजन 2030’ नुसार दोन्ही देशांतील विविध क्षेत्रातील व्यापाराला चालना मिळणार आहे, असे अल साती यांनी सांगितले.

सौदीच्या ‘विजन 2030’ नुसार पेट्रोलियम पदार्थांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सौदीकडून 17 टक्के कच्चे तेल आणि 32 टक्के एलपीजी हिंदुस्थान खरेदी करतो. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशातील व्यापार वाढला आहे. दोन्ही देशात 40 विविध क्षेत्रात सहकार्य आणि भागीदारी आणि गुंतवणुकीला संधी असल्याचे साती यांनी सांगितले. सध्या दोन्ही देशांत 34 अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार होतो. त्यात सातत्याने वाढ होत आहे. अरामको जगभरात विस्तार करणार असून हिंदुस्थानात गुंतवणूक करण्याचा कंपनीचा कंपनीचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.