सावर्डेचे पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात; 15 हजारांची लाच स्वीकारताना एकजण ताब्यात, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मनिष कांबळे यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. विम्याच्या दाव्यासाठी आवश्यक कादगपत्रे देण्याकरिता तब्बल 25 हजारांची लाच कांबळे यांनी मागितली होती. मात्र तडजोडीनंतर 15 हजार रूपये ठरवण्यात आले होते.

रत्नागिरी विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिपळूण येथे सापळा रचून ही कारवाई केली. सावर्डे पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक मनीष कांबळे यांच्याकडे गुन्हा रजिस्टर क्रमांक १४/२०२६ चा तपास प्रलंबित होता. या गुन्ह्यातील मृत व्यक्तीच्या वारसांना विमा रक्कम मिळण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करावयाचा होता. त्यासाठी अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल व डीओआर फॉर्म आवश्यक होते. ही कागदपत्रे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर याविषयी दोन पंचाच्या उपस्थितीत पडताळणी केली असता कांबळे याने तडजोडीनंतर 15 हजार रुपये देण्यास सांगितले. ही रक्कम स्वतःकडे न घेता अभिजित प्रकाश शिर्के ( ४२, रा. पाग, चिपळूण) या व्यक्तीकडे देण्याचे निर्देश तक्रारदारास फोनद्वारे दिल्याचे स्पष्ट झाले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून चिपळूण पोलीस स्थानकाजवळील सोमेश्वर जनरल स्टोअर्स या दुकानात तक्रारदाराने शिर्के यांची भेट घेतली. त्यावेळी शिर्के यांनी फोनवरून संबंधित कांबळे याच्याशी संपर्क साधला. दोघांतील संभाषणानंतर शिर्के यांनी तक्रारदाराकडून 15 हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारले. ही रक्कम पोलीस उपनिरीक्षकांच्या सांगण्यावरून व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत विभागाने शिर्के यांना लाच रकमेसह ताब्यात घेतले. या दोघांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे व त्यांच्या पथकाने केली.