माजी खासदार सावित्रीबाई फुले यांचा काँग्रेसलाही राम राम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. आता फुले यांनी काँग्रेसलाही राम राम केला आहे. तसेच आता त्या स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करणार आहेत.

सावित्रीबाई फुले या भाजप तिकीटावर उत्तर प्रदेशच्या बहराईच मतदार संघातून 2014 साली निवडून आल्या होत्या. पक्षात आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. फुले यांनी नंतर काँग्रेसमध्ये सामील होऊन निवडणूकही लढवली. परंतु भाजप उमेदवार शब्बीर वाल्मिकींसमोर त्यांचा पराभव झाला.

काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सावित्रीबाई फुले म्हणाल्या की पक्षात माझे ऐकले जात नाही म्हणून मी पक्ष सोडत आहे. आता नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. भाजपमध्ये असतानाही फुले यांची हीच तक्रार होती. भाजपच्या राज्यात चार वर्षात बहुजनांचे भले नाही झाले असे सावित्रीबाई फुले म्हणाल्या. तसेच हिंदुस्थानमध्ये जोपर्यंत संपूर्ण संविधान लागू होत नाही तोपर्यंत  बहुजनांचा उद्धार होणार नाही असे त्या म्हणाल्या होत्या. वर्षाभरापूर्वीच त्यांनी भाजपमधून राजीनामा दिला होता.