सयाजी शिंदे, अलका कुबल यांना मुंबै महोत्सवात सन्मान, जीवनाधार फाऊंडेशनच्यावतीने आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी जीवनाधार फाऊंडेशनच्यावतीने मुंबै महोत्सवात सन्मान केला जातो. यंदाच्या महोत्सवात अभिनेत्री आयेशा झुल्का, अलका पुबल-आठल्ये, अभिनेते सयाजी शिंदे, अली असगर यांना ‘मुंबई भूषण जीवनाधार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

‘जीवनाधार फाऊंडेशन’ ही सामाजिक संस्था असून राजेश खाडे संस्थेचे अध्यक्ष आहेत. यंदा मुंबै महोत्सवाचे चौथे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा फक्त निमंत्रितांच्याच उपस्थितीत 29 जानेवारीला अंधेरीत आणि 30 जानेवारीला भायखळा येथे सायंकाळी 6 ते 10 या वेळेत महोत्सव होणार आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अजय चौधरी यांना देखील ‘मुंबई भूषण जीवनाधार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ‘मुंबै भूषण’, ‘जीवनाधार जीवन गौरव’, ‘मुंबै गौरव’, ‘मुलखावेगळी माणसे’ आदी पुरस्कारांसाठी संगीतकार देवदत्त साबळे, नगरसेवक यशवंत जाधव, नाटय़ लेखक, अभिनेते जनार्दन लवंगारे, अभिनेते विजय पाटकर यांनासुद्धा सन्मानित केले जाणार आहे.

महापौर किशोरी पेडणेकर या महोत्सवाच्या अध्यक्षा असणार आहेत. तर आमदार यामिनी जाधव, नगरसेविका प्रतिमा खोपडे या स्वागताध्यक्ष म्हणून सहभागी होतील. यानिमित्ताने ‘मुंबै मेरी जान’ या  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.