वाजपेयींच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या सय्यद मतीनला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
syed-matin-mim

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला अटक करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली मतीन याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्या माजी जिल्हाअध्यक्ष जावेद कुरेशी यालाही अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केल्यामुळे मतीनला शिवसेना, भाजप नगरसेवकांनी बेदम बदडून काढलं होतं.

समांतर जलवाहिनीसंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी संभाजीनगर महापालिकेत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी ‘भारतरत्न’ अटलजींना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडताच एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याने उठून आपला श्रद्धांजली वाहण्यास विरोध असल्याचे सांगत आरडाओरड सुरू केली. त्याने आपला विरोध नोंदवून घेण्याचा आग्रह धरताच शिवसेना-भाजपचे नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी सरळ मतीन याला घेरून त्याला चांगलाच बदडून काढला.सय्यद मतीन याचे नगरसेवकपद कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आणि त्याला पुन्हा सभागृहात पाय ठेवू न देण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या. तसंच, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले.

अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध, एमआयएमच्या मतीनला धू धू धुतले

शिवसेना, भाजप नगरसेवकांकडून ‘प्रसाद’ मिळूनही मतीन याचा उन्माद कमी झाला नाही. उलट त्याने व्हिडीओ प्रसिद्ध करून ‘हो, मी केला विरोध’ अशी उद्दाम भाषा तर केलीच पण ‘मी एकटा होतो, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते’, अशी दर्पोक्तीही केली होती. तक्रार उपमहापौर विजय औताडे यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी या प्रकरणाचा तपास करून सय्यद मतीन यास अटक केली.

एमआयएमचा नगरसेवक मतीन यास सभागृहामध्ये मारहाण करण्यात आली असल्याचे समजताच माजी जिल्हाअध्यक्ष जावेद कुरेशी हा आपल्या समर्थकांसह मनपाच्या परिसरात दाखल झाला. त्याने व त्याच्या समर्थकाने दुकानावर आणि वाहनावर दगडफेक करत दहशत निर्माण केली. जावेद कुरेशीसह अन्य कार्यकर्त्यांविरोधात पोलीस कर्मचारी सातदिवे यांच्या तक्रारीवरून बेगमपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राडा करणाऱ्या जावेद कुरेशीला पोलिसांनी अटक केली आहे.