एटीएम कार्डद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी स्टेट बँकेची नवी सुविधा

प्रातिनिधिक फोटो

कोरोना महामारीच्या संकटात ऑनलाईन आणि एटीएम कार्ड फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या कठोर नियमांनंतरही अशा प्रकारची फसवणूक होत आहे. फसवणूक करणारे फसवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग वापरत आहेत. ही वाढती फसवणूक लक्षात घेता देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँकेने खातेधारकांना अशा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नवी योजना सुरू केली आहे. खातेधारकांना सुरक्षित बँकिंग सेवा देण्यासाठी बँकेने एसएमएस अलर्ट योजना सुरू केली आहे.

खातेधारक एटीएममध्ये बॅलेंस चेक किंवा मिनी स्टेटमेंटसाठी येतील, त्यावेळी खातेधारकांना एसएमएसद्वारे अलर्ट पाठवण्यात येईल. या सुविधेमुळे बॅलेंस चेक आणि मिनी स्टेटमेंट खातेधारकांनीच मागितले आहे, याची खात्री होईल, असे बँकेच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या सुविधेमुळे खातेधारकांच्या कार्डद्वारे इतर व्यक्ती व्यवहार करत असल्यास त्याची माहिती मिळणार आहे. एसएमएस अलर्ट सुविधेमुळे खातेधारकांच्या कार्डवर दुसरी व्यक्ती व्यवहार करू शकणार नाही, असेही बँकेने म्हटले आहे. या सुविधेमुळे बँकिग सुरक्षित होणार असून खातेधारकांची फसवणूक होणार नाही, असे बँकेने म्हटले आहे. बँकेने एसएमएसद्वारे अलर्ट पाठवल्यावर आपल्या कार्डद्वारे दुसरी व्यक्ती व्यवहार करत असल्याचे खातेधारकला समजल्यावर तो कार्ड ब्लॉक करू शकणार आहे.

खातेधारकांना दिलासा देण्यासाठी बँकेने काही शुल्कामध्ये कपात केली होती. त्यात एसएमएस अलर्ट आणि मिनिमम बॅलेंसचा समावेश आहे. बँकेच्या 44 कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे. या दोन्ही सुविधा ग्राहकांना आता मोफत मिळणार आहेत. तसेच खातेधारकांनी #YONOSBI डाउनलोड करावे, असेही बँकेने म्हटले आहे. बँकेने सुरू केलेल्या एसएमएस अलर्ट सुविधेमुळे फसवणूक कमी होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या