सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकरच मराठीत कळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाचे बहुतांश निकाल हे जनहिताचे असतात, मात्र ते केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्यांना न्यायाची पुरेशी माहिती होत नसे. ही गैरसोय आता दूर होणार आहे. लवकरच हिंदी आणि मराठीसह कन्नड, आसामी, उडिया आणि तेलगू अशा प्रादेशिक भाषांमध्येही न्यायालयाचे निकालपत्र अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

जुलैच्या अखेरीपर्यंत आपले निकालपत्र अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र हिंदीमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्याच मागणीची अखेर दखल घेतली गेली आहे. सुरुवातीला 500 पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरूपात उपलब्ध केली जाणार आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर विंगने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मंजुरी दिली आहे.

अनुवादित प्रत आठवडाभरात

सर्वोच्च न्यायालय कोणत्याही खटल्यात ज्या दिवशी आदेश देईल त्या दिवशी इंग्रजी भाषेतील निकालपत्र वेबसाइटवर उपलब्ध होईल. नंतर पुढील आठवडाभरात इतर सहा भाषांमध्ये अनुवाद केलेली निकालाची प्रत उपलब्ध केली जाणार आहे.

राष्ट्रपती कोविंद यांची कल्पना

देशातील उच्च न्यायालयांनी निकालपत्राची प्रमाणित अनुवादित प्रत  स्थानिक किंवा प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध करावी अशी कल्पना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये मांडली होती.