
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
खुनाचा आरोप असलेली व्यक्ती राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊ शकते काय, असा सवाल सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अधिपत्याखालील घटनापीठाने उपस्थित केला.
गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती आर.एफ. नरीमन, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर झाली. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने वरील सवाल विचारला.
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन’तर्फे दिनेश द्विवेदी यांनी दाखल केली आहे.
लोकसभा कायदा कशी करेल?
३४ टक्के लोकप्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, असे २०१४ सालात उघड झाले आहे. त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखणारा कायदा लोकसभेत मंजूर होणे शक्यच नाही, असा दावा द्विवेदी यांनी आपल्या जनहित याचिकेत केला आहे.
अॅटर्नी जनरल काय म्हणाले?
गुन्ह्यांचे आरोप असलेली व्यक्ती राज्यघटनेचे पालन करणार नाही, असे शपथेमध्ये काहीही नाही. तसेच खटल्यांची सुनावणी निःपक्षपातीपणे होण्याचा अधिकार राज्यघटनेनेच बहाल केलेला आहे. तसेच गुन्हा न्यायालयात सिद्ध होईपर्यंत कोणतीही व्यक्ती निर्दोषच मानली जाते, असे केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी या सुनावणी वेळी सांगितले.

























































