
सार्वजनिक आरोग्य विभागात रोजच्या रोज भ्रष्टाचाराचे नवनवे उद्योग समोर येत आहेत. या विभागाने अक्षरशः असाध्य आजार असलेल्या कर्करुग्णांनाही सोडलेले नाही. कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदीत आठ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. सध्याच्या बाजारभावाशी किमतीची पडताळणी करण्यात आलेली नसून अधिक पिंमत मोजून कमी प्रतीच्या आणि कमी दर्जाची उपकरणे असलेल्या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदी करण्यात आल्या आहेत.
कॅन्सर निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन बाजार भावापेक्षा दुप्पट किंमत देऊन खरेदी करण्यात आल्या आहेत. ही वाहने अंदाजे 45 ते 55 लाख रुपयांमध्ये किंवा त्याहून कमी किंमतीत मिळू शकली असती, परंतु अंदाजपत्रकातील तरतूद आणि किंमत केंद्रस्थानी ठेवून साधारण प्रतीची, कॅन्सर निदान करण्यासाठी अतिशय तोकडी, बिनकामाची आणि उपयुक्त नसलेली कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदी करण्यात आलेली आहे. कोणतीही खरेदी करताना खरेदी अधिकाऱ्यांना निविदेच्या माध्यमातून दर प्राप्त झाल्यानंतर त्या दरांची वर्तमानातील बाजारभावाशी पडताळणी करणे, मागील खरेदी, गर्व्हन्मेंट ई- मार्पेट प्लेसवरील दर, इतर राज्यांच्या सार्वजनिक आरोग्य विभागांना सादर केलेले दर इत्यादींबरोबर तुलनाक आणि निविदाकाराने सादर केलेले साहित्य अपेक्षित दर्जाचे तसेच योग्य किमतीचे आहे किंवा नाही याचे विश्लेषण बंधनकारक आहे, मात्र या खरेदीत या नियमांचे ठळकपणे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसत आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करा
परिवहन विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून पडताळणी करण्यात आली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने बाजारभावापेक्षा दुप्पट दर देऊन कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदी केल्या आहेत. या घोटाळय़ाचा सूत्रधार तत्कालीन उपसंचालक, भांडार अधिकारी पैलास कराळे असून यांनीच सर्व निविदा प्रक्रिया नियमानुसार करणे गरजेचे होते. कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या दरांबाबत विश्लेषण करून प्राप्त दर अधिक असल्याचे अभिप्राय देणे गरजेचे होते, परंतु त्यांनी तसे न करता पुरवठादार कंपनीसोबत संगनमत करून बाजारभावापेक्षा दुप्पट किंमत देऊन कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदी केल्या आणि सरकारची फसवणूक केली.
असा झाला भ्रष्टाचार
कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचे अंदाजपत्रक तयार करत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. चासीस भारत बेंझची किंमत अंदाजे 50 लाख आहेत. त्यात फॅब्रिकेशनसाठी 20 लाख, कॅन्सर डायग्नोस्टिक उपकरणांसाठी 19 लाख, कर आणि इतर खर्च 10 लाख खर्च आला आहे. अशा प्रकारे व्हॅनची किंमत 99 लाखांवर गेली. या किमतीत वाहन खरेदी करण्यात आले.
चासीस टाटा या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची अंदाजे मूळ किंमत 15 लाख रुपये आहे. त्यात फॅब्रिकेशनवर 15 लाख रुपयांचा खर्च, कॅन्सर डायग्नोस्टिक उपकरणांवर 5 लाख, कर आणि इतर खर्च 10 लाख अशा प्रकारे 99 लाखांचे वाहन अंदाजे 45 लाख रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकले असते, परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाने आठ कोटी रुपये मोजून आठ व्हॅन खरेदी केल्या.