
पुणे शहरात बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूकीचे सत्र कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. दस्तनोंदणीत जागामालकालाच मयत असल्याचे दाखवून एकतर्फी दस्त नोंदवून मिळकत बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजाराम पुणेकर, मीना पुणेकर आणि चेतन पुणेकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अविनाश रामभाउ कानगुडे (वय 44, रा. मुळशी खुर्द) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश यांनी डिसेंबर 2019 मध्ये बळवंत दातार यांच्याकडून कर्वेनगरातील महर्षीनगरमध्ये 16 हजार चौरस फूट जागा विकत घेतली होती.
त्यासंदर्भात कुलमुख्यत्यार दस्त त्यांनी हवेली सबरजिस्ट्रार यांच्याकडे केला होता. दरम्यान, बळवंत दातार यांनी 1984 साली 10 हजार चौरस फूट जागा राजाराम पुणेकर यांना 99 वर्षांसाठी भाडेकराराने दिली होती. पंरतु, 2000 सालापासून पुणेकर यांनी दातार यांना मिळकतीचे भाडे दिले नव्हते.
त्याशिवाय मिळकतीशेजारील 7 हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले होते. त्यामुळे दातार यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये पुणेकर यांना करारनामा रद्द झाल्याची नोटीस पाठविली. त्यानुसार पुणेकर यांनी दातार यांच्या नोटीशीला उत्तर देताना 20 हजार चौरस फूट जागा ताब्यात असल्याचे नमूद केले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे बळवंत दातार यांच्या लक्षात आले.
चौकशीत 23 एप्रिल 2008 मध्ये राजाराम पुणेकर यांनी हवेली सबरजिस्ट्रार कार्यालयात खोट्या मजकुराचे घोषणापत्र लिहून नोंदविले होते. त्यामध्ये बळवंत दातार मयत झाल्याचे दाखवून एकतर्फी दस्त नोंदविला. बळवंत दातार जिंवत असतानाही पुणेकर यांनी खोटे घोषणापत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी तपास करीत आहेत.

























































