हातकणंगले येथे कंटेनर आणि स्कूल बसची धडक, दोन जण मृत्युमुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, हातकणंगले

सांगली महामार्गावर चोकाक-माले फाटा दरम्यान कंटेनर आणि स्कूल बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये कंटेनरमधील दोघे जण जागीच ठार झाले आहेत. सुरेश खोत (कवठेमहांकाळ) आणि सचिन खिलारे (खेनवडे जि. सातारा ) अशी मृतांची नावे आहेत. कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे हातकणंगलेच्या दिशेने जाणाऱ्या स्कूल बसला कंटेनरची धडक बसली. अपघातात कंटेनरमधील दोघे जागीच ठार झाले, तर स्कूल बसमधील चालक, दोन सेविकांसह २६ विद्यार्थी जखमी झाले.

जखमींवर रुकडी येथील डॉ. विजय पवार यांच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिग्रे ( ता. हातकणंगले ) येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची स्कूल बस ( एम एच ०९ बी सी ३०४९ ) ही गांधीनगरहून विद्यार्थी घऊन शाळेच्या दिशेने येत होती तर कंटेनर कोल्हापूरच्या दिशेने ( एम एच ०९ इ एम ३९३९) भरधाव वेगाने निघाला होता. कंटेनरच्या चालकाचा चोकाक- माले फाटा दरम्यान ताबा सुटल्याने दुभाजक ओलांडून त्याने स्कूल बसला जोरदार धडक दिली.

यावेळी स्कूल बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून बसचा वेग नियंत्रीत करत धडक चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र कंटेनरचा वेग इतका होता की, बसला धडक देऊन कंटेनर रस्त्याच्या उलट दिशेला असलेल्या शेतात घुसला. या अपघातात कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर स्कूलमधील इयत्ता १ली ते १०वीच्या २६ विद्यार्थ्यांसह चालक व दोन सेविका जखमी झाल्या.