
शहरात जोरदार पाऊस सुरू असेल तर पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्या आणि आणण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागणार आहे. मुंबईत मुसळधार पावसावेळी स्कूल बसची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस चालक–मालक संघटनेने घेतला आहे. हवामान विभागाने मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला असेल तर त्या दिवशी स्कूल बसची सेवा बंद राहणार आहे.
नवीन स्कूल बसेसमध्ये सेन्सर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले असेल तर विद्यार्थी वाहतूक करणे धोकादायक ठरू शकते. शिवाय यामुळे वारंवार वाहनात बिघाड झाल्यास बस मालकांनाही त्रास होऊ शकतो. स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले, ‘बसमधील नवीन सेन्सर्स मुसळधार पावसात काम करू शकत नाही. त्याच्या इंजिनला पाण्याचा स्पर्श होताच ते खराब होण्याची भीती असते. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने बस चालकांना रस्त्यावरील खड्डेही दिसत नाहीत. या खड्डय़ांमध्ये लहान मुलांसह बसेस अडकल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.’
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यास व प्रत्यक्षात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडत असल्यास स्कूल बस धावणार आहेत की नाही याबाबत शाळांना कळविले जाईल, असेही गर्ग म्हणाले.























































