Video – चंद्रपुरात परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आयडी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात मार्च महिन्यापासून शैक्षणिक सत्रात अनियमितता आली आहे. राज्यातील अनेक शाळा 1 जुलैपासून ऑनलाइन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. आता या विद्यार्थ्यांच्या पहिल्या परीक्षेची वेळ येऊन ठेपली आहे. या काळात पालकांनी पूर्ण शुल्क भरावे यासाठी नारायणा विद्यालय चंद्रपूरच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आयडी बंद केले आहेत.

ज्या पालकांनी पाल्याचे पूर्ण शैक्षणिक शुल्क भरले त्यांनाच हा आयडी दिला जात आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची कोंडी केल्याच्या निषेधार्थ नारायणा विद्यालय चंद्रपूरच्या पालकांनी आज शाळेत जात आपला तीव्र निषेध नोंदविला. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत विद्यार्थी घरूनच धडे घेत असल्याने आणि सोबतच कोरोना काळात पालकांच्या वेतनातील अनियमितता लक्षात घेता शैक्षणिक शुल्क निम्मेच घेण्यात यावे, अशी मागणी पालकांनी व्यवस्थापनाकडे केली आहे. मात्र समन्वयाच्या अभावामुळे यातून मार्ग निघालेला नाही. 24 ऑगस्टपासून पहिल्या परीक्षेला सुरुवात होत आहे. त्याआधी यातून तोडगा निघावा, अशी विनंती पालकांनी व्यवस्थापनाकडे केली आहे. या संपूर्ण घडामोडीवर नारायणा विद्यालय शाळा व्यवस्थापनाने मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.