मोबाईल दिला नाही म्हणून शाळकरी मुलाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना ऑनलाईन, यवतमाळ

मोबाईल विकत घेऊन दिला नाही या क्षुल्लक कारणावरून 14 वर्षांच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर गावातील ही घटना आहे.

हा मुलगा नववीमध्ये शिकत होता आणि आईवडिलांकडे गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल विकत घ्या असा हट्ट करत होता. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे वडील हे शतकरी असून त्यांची झुंझारपूर इथे शेती आहे. त्यांचा मुलगा अँड्रॉईड मोबाईल पाहिजे म्हणून गेले काही दिवस हट्ट करीत होता. या हट्टामुळे वडिलांनी त्याला कापूस विकून येतील त्या पैशातून तुला मोबाईल विकत घेऊन देतो असं आश्वासन दिलं होतं.

29 तारखेला हा मुलगा त्याच्या मोठ्या भावाला डबा देण्यासाठी शेतात गेला होता. जेवण झाल्यानंतर भाऊ दिसत नाही म्हणून मोठ्या भावाने सगळीकडे शोधायला सुरुवात केली. शोधता शोधता त्याला भावाचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. नायलॉनच्या दोरीने गळफास लावत त्याने आत्महत्या केली होती.