ऊन वाढतेय… शाळांच्या वेळा कधी बदलणार? नगर जिल्हा परिषदेसह खासगी शाळांचेही दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निम्मा मार्च महिना होत आला असून, उन्हाचा कडाका वाढला आहे. अशा स्थितीत ऐन उन्हाच्या तीव्रतेत ग्रामीण व शहरी भागात शाळा सुरू आहेत. मुलांना उन्हाचा त्रास होत आहे. नगर जिह्याशेजारी असणाऱया बीड, सोलापूर आणि नाशिक जिह्यांत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नगर जिह्यातील शाळांच्या वेळा कधी बदलणार, याची शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.

नगरसह राज्यात वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहेत. अशात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसभर भरविण्यात येत असून, यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. उन्हाची तीव्रता वाढली, तरी प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व शहरी भागातील खासगी शाळांचे दुर्लक्ष होत आहे.

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेचा पारा चढत आहे. नगर जिह्यातही तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. येत्या काही दिवसांत जिह्यात उष्णतेची लाट सांगण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे माणसांसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिह्यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांवर पत्र्याचे छत आहे. वाढत्या तापमानामुळे शाळांवरचे पत्रे तापून वर्गामध्ये उकाडा वाढतो, तसेच अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे शाळा दिवसभर सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आधीच प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शाळा आणखी काही काळ सुरू राहणार आहेत व त्यानंतर परीक्षा होणार आहेत. अशा स्थितीत पुढच्या एप्रिल महिन्यातील आणखी वाढत्या उन्हाची तीव्रता विद्यार्थ्यांना त्रासदायक होणार असल्याने आतापासूनच शाळांची वेळ बदलण्यास हरकत नाही, असा सूर शिक्षकांमधून आहे. यासाठी सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती लवकरच जिल्हा परिषद प्रशासनाला भेटणार असून, जिल्हा परिषदेच्या 3 हजार 569 शाळांची वेळ बदलण्याची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवा

शिक्षण समिती अथवा जिल्हा प्रशासनाने शिक्षक डोळ्यांसमोर न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था जाणून घ्यावी. मुळात संघटनांना सकाळच्या शाळेची मागणी करावी लागते हेच दुर्दैव आहे. प्रशासन स्वतःच असा निर्णय घेऊ शकत नाही का? उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांचे काय हाल होतात याची जाणीव शिक्षण व शिक्षकांवर नेहमी बोलणाऱयांना होणे आवश्यक आहे, अशी भावना शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केली.