आता पुन्हा शाळा बंद होणे नाही; हे शाळेचे नव्हे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचे दार उघडले आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली. कोरोना नियम पाळत अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत झाले. कुठे औक्षणही करण्यात आले. शिक्षकांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही तास घेतले.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला सर्वात कठीण, आव्हानात्मक काळ सध्या सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक, कोवळी आहेत. हे वय त्यांच्या घडण्याचं आणि त्यांना घडवण्याचं असते, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शाळेचे द्वार उघडल्याचे आपण पाहत आहोत. ते केवळ शाळेचे द्वार नाही तर ते विद्यार्थ्यांच्या भविष्याचं द्वार आहे, विकासाचं द्वार आहे आणि ते उघडताना खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागला आहे, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. ती आपण सर्व एकत्रित राहून पार पाडू. एकदा उघडलेल्या शाळा आपण पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाहीत, या निर्धाराने आयुष्याला सुरुवात करूया, असे आवाहनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना केले.

कोरानाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर तब्बल दीड वर्षाने आज शाळा सुरू झाल्या. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना ‘माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो’ अशी साद घातली. अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा ऐपू येणार आहे. त्याबद्दल मी आपल्याला शुभेच्छा देतो,  अशा शब्दांत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मला माझ्या शाळेचे दिवस आठवत आहेत. शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू व्हायची, पावसाचे दिवस असायचे त्यावेळचा मातीचा सुगंध, नवीन पुस्तक, नवीन गणवेश, नवीन वर्ग, आपल्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची. शाळेचं आयुष्य सुरू व्हायचं. एकेक वर्ष उलटली, खूप झपाटय़ाने तो काळ गेला. हा काळ जरी आमच्या आयुष्यातून निघून गेला असला तरी आताचे जे विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या आयुष्यातील हा कठीण आणि आव्हानात्मक काळ आहे. मला आठवतं तेव्हा दांडी मारण्याची लहर यायची, पण आता शाळेत जाऊ कधी हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

आपण सर्व एक कुटुंब

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे आव्हानात्मक होते. याचे कारण मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे होते. ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ एवढय़ापुरतेच हे मर्यादित नाही. त्याची सुरुवात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेपासून झाली. आपण सर्व एक कुटुंब आहोत. वेळोवेळी टास्क फोर्सच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन आपण घेत आहोत. त्यामुळेच आज शाळा सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिक्षक आणि पालकांनी  विद्यार्थी आणि पाल्याची जबाबदारी व्यवस्थित घ्यावी. आम्ही सोबत आहोतच. कुठेही कोणत्याही शिक्षकाला वाटलं की आपल्याला थोडं बरं वाटत नाही आहे तर त्यांनी न डगमगता टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याचे कारण पावसाळा संपत आला असला तरी पावसाळा संपून ऑक्टोबर हीट सुरू होणार आहे. प्रत्येक सिझन बदलत असताना त्याचे साथीचे रोग येत असतात. त्यावेळी तो कोरोना तर नाही ना याची खात्री करून घ्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी संवाद

शाळेचे, प्रत्येक वर्गखोलीचे  निर्जंतुकीकरण करताना कुठेही आसपास विद्यार्थी असणार नाहीत याची काळजी घ्या. कळत नकळत ते कुठे बसताहेत तिथे निर्जंतुकीकरणाचा अतिरिक्त वापर झालेला नाही ना याची खात्री करून घ्या.

जशी हसती खेळती मुलं तशी शाळेच्या वर्गातील हवाही खेळती असणं महत्त्वाचं आहे.

रवींद्रनाथ टागोर यांची ‘शांतिनिकेतन’ शाळा आपल्याला माहित आहे. आता आपल्याला पटतंय की तेव्हा सुविधा नसतील म्हणून त्यांनी तसे केले होते की निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देणे अधिक आरोग्यदायी आहे म्हणून त्यांनी तसे केले होते? तेव्हा आपल्याला पहिली खात्री बाळगायची आहे की कुठेही शिक्षणाची जागा किंवा वर्ग बंदिस्त असता कामा नयेत.

कोरोनाने आपल्याला काय शिकवलंय याचा अंदाज घेऊन त्यादृष्टीने आपले पुढचे आयुष्य आरोग्यदायी व्हावे ही जबाबदारी सरकारची आहे.

आपले हे विद्यार्थी आपले भविष्य घडविणारे आधारस्तंभ आहेत. त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं, त्यांची जबाबदारी घेणं हे फार महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण एकत्रित राहून ही जबाबदारी पार पाडू.