दप्तर हलके करण्यासाठी पाठय़पुस्तकाचे तीन भाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पाठय़पुस्तकाचे तीन भाग केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील भार कमी होईल, असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केला.

सर्व शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासूनच द्विभाषिक पाठय़पुस्तके देण्यात येतील. त्यासाठी एकात्मिक पुस्तक संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे.

पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी सात विविध विषयांची पुस्तके एकाच वेळी शाळेत नेण्याऐवजी संपूर्ण अभ्यासक्रमाची तीन भागात विभागणी करून एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. हे पुस्तक तयार करताना गणित आणि विज्ञान या विषयांत ठिकठिकाणी मराठीबरोबरच इंग्रजीतील संकल्पनांचाही वापर केल्याने विद्यार्थ्यांना आता द्विभाषिक पाठय़पुस्तक या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होत आहे, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.