चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा

अंबरनाथमध्ये एका खासगी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकले रस्त्यावर फेकले गेल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याणमधून त्याहून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरात चक्क माल वाहू टेम्पोमध्ये कोंबून चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण केली जात आहे. या टेम्पोमध्ये ना सुरक्षित आसनव्यवस्था, ना बंद दरवाजे. मुलं अक्षरशः टेम्पोच्या लोखंडी पट्टयांना धरून प्रवास करतात. विद्यार्थ्यांच्या या प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी आधी तक्रार करा, मग बघू असे बेजबाबदार उत्तर दिले. अंबरनाथच्या अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. ही घटना घडून आठवडाही उलटलेला नाही तोच कल्याणमध्ये अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कल्याण पूर्व येथील पत्रीपूल परिसरात एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांची चक्क एका मालवाहतूक टेम्पोमधून ने-आण होते. या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही आसनव्यवस्था नाही, दरवाजेही नाहीत. विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्टया धरून उभे आहेत. जर हा टेम्पो भरधाव वेगात असताना थोडासाही असंतुलित झाला तर ही निष्पाप मुले थेट रस्त्यावर फेकली जाऊन भीषण अपघात होण्याची शवन्यता आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि अपघातांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे, आरटीओची निष्क्रियता आणखी किती बळी घेणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

नोटीस बजावून जबाबदारी झटकली
अंबरनाथच्या घटनेनंतर कल्याण आरटीओने तिथे केवळ काही शाळांना नोटिसा बजावून आपली जबाबदारी झटकली. प्रत्यक्ष कारवाई, अनधिकृत बसेसची तपासणी, दोषींवर परवाने रद्द करण्याची कारवाई यापैकी काहीच झाले नाही. आज त्याच आरटीओ कार्यालयाच्या काही अंतरावर असलेल्या परिसरातून विद्यार्थी टेम्पोमधून जीवघेण्या पद्धतीने नेले जात आहेत. कहर म्हणजे तक्रार करा, मग आम्ही पाहू, अशी बेजबाबदार उत्तरे आरटीओकडून दिली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.