शाळेतील मस्ती अन् बाकावरचे जेवण, कराडच्या हॉटेलचालकाची भन्नाट कल्पना; ‘शाळ करी’त गर्दी

डय़ुटीवरील खुर्चीपेक्षा, शाळेचा बाक बरा होता…कामाच्या या व्यापापेक्षा, आमचा गृहपाठच बरा होता…’ शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला हळवा कोपरा. दैनंदिन आयुष्यात कामाचा कितीही व्याप असला तरी ‘शाळा’ हा शब्द उच्चारताच आपण बालपणीच्या आठवणींत रमतो. वर्गात मित्रांसोबत केलेली मस्ती असो किंवा सगळी भांडण विसरून लाकडी बाकावर एकत्र बसून खाल्लेला डबा अशा सगळ्या गोष्टी आठवतात. कोरोनामुळे देशभरातील शाळा बंद असल्या तरी कराडमध्ये नव्याने सुरू झालेल्या एका शाळेत मात्र ’शाळ करीं’ ची गर्दी पाहायला मिळतेय.

सोशल मिडियावर सध्या कराडमधील ’शाळ करी’ या हॉटेलाचे फोटो व्हायरल होतायत. नांदलापूरच्या पाचवड फाटा येथील हे हॉटेल ‘स्कूल थीम’ घेऊन तयार केले आहे. या हॉटेलात प्रवेश करताच आपण एखाद्या शाळेतच आलोय की काय असं वाटतं. गेल्या दहा वर्षांपासून हॉटेल व्यवसायात असणाऱ्य़ा अमित बुधकर आणि राहूल भोसले या मराठमोळ्या तरुणांची ही भन्नाट कल्पना.

school-theme-hotel2

या थीमबाबत अमित म्हणाला, ‘सातत्याने ग्राहकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न गेल्या दहा वर्षांपासून आम्ही आमच्या शिवार या हॉटेलाच्या माध्यमातून करतोय. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे ‘शाळ करी’. शाळा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मित्रमैत्रिणींसोबत जुन्या आठवणीत रमून बाकावर बसून पुन्हा डबा खाण्याचा फिल यावा, शाळेची तिच धम्माल पुन्हा अनुभवता यावी हा यामागचा हेतू आहे. अल्पावधीत आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळतोय. थीमचेही लोक काwतुक करतायत.

बोर्डाचा रिझल्ट की मेन्यू कार्ड?

hotel-shalkari-menu-card

या हॉटेलातील मेन्यू कार्ड दहावी-बारावीच्या बोर्डाच्या रिझल्टप्रमाणे हुबेहूब तयार करण्यात आले आहे. मेन्यू कार्डवर बोर्डाच्या नावाऐवजी ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक खाद्य मंडळ’ असं लिहिलंय. विद्यार्थ्याच्या नावाऐवजी हॉटेल ‘शाळ करी’ असा उल्लेख आहे, तर विषयाच्या जागी जेवणाचा मेन्यू देण्यात आलाय.

सुविचार, कविता आणि बरंच काही!

hotel-shalkari-2

हॉटेलात शिरताच दोन डायनिंग हॉलला ‘अ’ तुकडी आणि ‘ब’ तुकडी अशी नावे दिली आहेत. ग्राहकांना वर्गाचा फिल यावा डायनिंग हॉलमध्ये भिंतींवर सुविचार, म्हणी, कवितांचे तक्ते लावले आहेत. तसेच वर्गात सर शिकवताना मुलांची मस्ती, मधल्या सुट्टीत रुमालाच्या बॉलने क्रिकेट खेळणे असे प्रसंग स्केचच्या माध्यमातून उभे केले आहेत. आलेल्या ग्राहकांची शाळेतील लाकडी बाकावर जेवणाची व्यवस्था केली आहे. इतपंच काय तर ऑर्डरदेखील शाळेतल्या डब्यांतून मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या