विज्ञानाचे अद्भूत जग

1382

>> अ.पां. देशपांडे

अजूनही आपल्याकडे विज्ञान या शब्दाचा बाऊ केला जातो. पण या अवघड केलेल्या विषयाची आवड मुलांमध्ये रुजावी म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे आजपासून बाल विज्ञान संमेलन भरवण्यात येत आहे. या निमित्ताने जाऊया अदभूत वैज्ञानिक जगात…

विज्ञान…तीन अक्षरी शब्द… प्रयोगाद्वारे उलडगडणारा, सोपा होत जाणारा विषय… मुलांना हा विषय सहज समजावता यावा याकरिता होमी भाभा विज्ञान केंद्र आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यांकरिता तीनदिवसीय ‘विज्ञान संमेलन’ आयोजित करण्यात येत आहे.मराठी विज्ञान परिषद ही संस्था 1966 साली स्थापन झाली. 1994 साली शालेय विद्यार्थ्यांसाठी पहिलं संमेलन झालं. यंदाचं हे संमेलन 54 वे आहे. मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी त्यांच्या प्रत्येक कृतीला वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा यासाठी हवेवर, विजेच्या आधाराने करता येणारे प्रयोग, उष्णतेचे प्रााsग, चुंबकाच्या आधारे करता येणारे प्रयोग असे वेगवेगळे प्रयोग मुलांना समजावून देता येतात. असे दैनंदिन जीवनातील घडामोडींशी निगडित प्रयोगांमुळे मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊ शकते.  प्रयोग करताना आम्ही प्रयोगशाळेतली किमती उपकरणं न वापरता घरातील वस्तू घेऊन करतो. त्यामुळे मुलं आपापल्या घरातल्या वस्तू घेऊनसुद्धा हे प्रयोग करायला उत्सुक असतात आणि ते करू लागतात.

 विज्ञानाचा विषय  शिक्षक तो किती चांगल्या पद्धतीने शिकवतात. यावर तो अवलंबून आहे. बारावीमध्ये ज्या मुलांना ऐंशी ते नव्वद टक्के गुण मिळतात. ती मुले इंजिनीयरिंग, मेडिकल, बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात प्रवेश करतात. ज्यांना साठ ते ऐंशी टक्के गुण मिळतात ती मुले बीएससी, एमएससीला करतात आणि साठ टक्के गुणांपेक्षा कमी गुण ज्यांना असतात ती मुलं बीएससी, बीएड होऊन शिक्षक होतात. त्यामुळे अशा शिक्षकांकडून आपण किती अपेक्षा करणार.  वर्गात शिकवला जाणारा विषय मला आधीच समजावा ही ईर्षा हळूहळू कमी होताना दिसते. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

यंदाचं विज्ञान संमेलन…
मराठी विज्ञान परिषद आणि होमी भाभा विज्ञान केंद्रातर्फे 16, 17 आणि 18 नाव्हेंबर रोजी विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनात एकदा वापरलेल्या प्लॅस्टिकचं काय करायचं, पर्यावरण चांगलं राहण्यासाठी काय करावं अशा पद्धतीचे विज्ञानाशी संबंधित 21 विषय विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्यापैकी कुठलाही एक विषय निवडून त्यांनी दहा मिनिटे तो विषय सादर करायचा आहे. या प्रयोगांचं वैशिष्टय़ असं की ते पॉवर पॉइंटवर सादर करायचे आहेत. इयत्ता सातवी ते बारावीची मुलं या संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी पॉवर पॉइंट कसं वापरायचं हे शिकावं, इतरांसमोर कसं बोलावं, इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यावीत अशी प्रवृत्ती निर्माण करण्याचा यामागे उद्देश आहे.

विज्ञान सोपे कसे होईल?
शाळेत विज्ञानाचा उगीचच बाऊ केला जातो  प्रयोग करून बघितल्यामुळे हा विषय सोपा होतो. त्याकरिता स्वयंपाकघरात सर्व प्रकारचं विज्ञान आहे. स्वयंपाकघरातल्या गोष्टी शिकलो तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र सगळे विषय शिकता येतात.

 पालकांनी काय करावं?
विज्ञानाची आवड लहानपणापासून मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी त्यांना छोटी छोटी  प्रयोगांची पुस्तकं वाचण्यास द्यावीत. खेळणी उघडून बघितली तर दिलेलं खेळणं वाया गेलं म्हणून रागावू नये. दुरुस्त करण्यासाठी कोणतीही वस्तू उघडावीच लागते. यामुळे मुलांमध्ये उत्सुकता निर्माण होते.   गावातील पक्षी मुलांना दाखवावेत. झाडं कोणती आहेत. त्यांना ओळखता येतात का? झाडांचं चक्र कसं आहे, त्यांना फुलं केव्हा येतात. पालवी केव्हा फुटते, फळं केव्हा येतात, पानं केव्हा गळून पडतात या चक्राची नोंद करण्यास शिकवावं.

मजेशीर प्रयोग
शहाळ्याचं पाणी प्यायल्यानंतर रिकाम्या शहाळ्यात फ्रीजमधील थंड पाणी भरून ठेवल्यास ते तीन ते चार तास थंड राहते किंवा चहाही बराच वेळ गरम राहू शकतो.

इडली पात्रात पाणी भरुन ते पाणी फ्रिझरमध्ये ठेवायचे. दुसऱया दिवशी त्या पात्रात इडलीच्या आकाराचा बर्फ तयार होतो, ते बर्हिगोल भिंग झालं. ते भिंग हातात घेतल्यास बारीक अक्षरे मोठी दिसतात. लहान अक्षर मोठी दिसण्यासाठी बर्हिगोल भिंगाचा वापर केला जातो, बर्हिगोल भिंग म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी हा प्रयोग करु शकता.

स्ट्रॉ घेऊन त्याच्या एका टोकाला कात्रीने व्ही आकार एका टोकाला दिला. तो व्ही आकाराचा भाग दोन ओठांमध्ये धरायचा आणि फुंकायचा.  नंतर 1 से.मी. कात्रीने दुसऱया बाजूचा भाग कापायचा आणि परत फुंकायचा. असे सातवेळा करायचे आणि प्रत्येकवेळी त्याचा आवाज ऐकायचा. जसा जसा स्ट्रॉचा आकार कमी होत जातो तसा आवाज उंच होत जातो. स्ट्रामध्ये असलेली जी हवा आहे एअर कॉलम जसा कमी होतो लांबी तसा आवाज उंच होतो. हे बासरीचे प्रिसिंपल आहे.

ग्लासामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये स्ट्रॉ बुडवा, स्ट्रॉचे वरचे टोक ग्लासच्या वर राहूदे, दुसरा स्ट्रॉचा तुकडा घ्या, तो आपल्या ओठामध्ये धरुन ग्लासच्या वर आलेल्या स्ट्रॉच्या तुकडय़ापाशी जोडा आणि फुंकर मारा. फुंकर मारल्यावरती ग्लासमधले पाणी वरती चढून समोरच्या बाजुला फवारा उडतो, हे आपल्या पावसाचं प्रिसीपल आहे.

विज्ञानात रुची वाटते
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञान या विषयाच्याच सान्निध्यात असतो. पण त्यामागच्या कारणांचा आपण विचारच करत नाही. पण त्याचा अभ्यास केला तर तो खूप प्रोत्साहन देणारा आहे हे माझ्या लक्षात आलं त्यामुळे मला विज्ञानाची रुची वाटते. यंदाच्या विज्ञान संमेलनासाठी मी ‘पूर’ या विषयावर प्रकल्प सादर करतेय. पुराच्या वेळी आपत्ती व्यवस्थापन कसं करायला हवं, आपत्तीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो, यातून लोकांना कसं वाचवलं गेलं पाहिजे, महानगरपालिका, नगरपालिका यांची माहिती मी संमेलनात सादर करणार आहे.
– बालवैज्ञानिक प्राजक्ता चिनावलकर, के.एन. नुरानी ज्युनियर कॉलेज, नंदुरबार 

मला विज्ञान विषय आवडतो
मला विज्ञान विषय फार आवडतो. विज्ञानामुळे आपल्याला जगातली माहिती मिळते. सोलर सिस्टिमबद्दल माहिती घ्यायला फार आवडते. मी एकदा घरी टिश्यू पेपरपासून सोलर सिस्टिम बनवली होती. घरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतो. जसं की, पंखा बनवणे, मोटरचे प्रयोग करणे मला खूप आवडते. मला डिस्कव्हरी वाहिनी बघायला फार आवडते. यातून मला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते.
– बालवैज्ञानिक अभिनेता आर्यन देवगिरी, ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, कांदिवली 

उत्सुकता वाढवणारा विषय
आम्हाला आमच्या शाळेतील शिक्षक विज्ञानावर आधारित प्रयोग करायला शिकवतात. त्यामुळे आमची या विषयाबद्दलची उत्सुकता वाढते, शिवाय जवळीकही वाटते. कारण नवनवीन प्रकल्प सादर करायला, शिकायला मिळतात. आता आम्ही शाळेतले विद्यार्थी पावसाच्या वाया जाणाऱया पाण्याचे नियोजन कसे करायचे याविषयीचा प्रयोग सादर करणार आहोत. शेतात, शहरात, रोजच्या वापरात पावसाचे पाणी कसे वापरता येईल, यावर शिक्षकांच्या मदतीने काम करणार आहोत.
– अभिनेता आदर्श कदम,इंडियन एज्युकेशन हायस्कूल, भांडुप 

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या