
सामना ऑनलाईन । लंडन
भूगर्भशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा शोध लावला आहे. मेघालय असे या युगाचे नाव आहे. आजपासून ४२०० वर्षांपूर्वी सुरू झालेला हा कालखंड आहे. कालखंडात जगभरात अचानक खूप दुष्काळ पडला होता आणि तापमानात घट झाली होती. परिणामी जगातील अनेक संस्कृती नामशेष झाल्या.
आंतरराष्ट्रीय भूगर्भसंशोधकांनी शोधलेल्या मेघालय युगाचे कनेक्शन हिंदुस्थानातील मेघालय प्रांताशी आहे. संशोधकांनी मेघालयातील एका गुहेतील छतातून जमिनीवर पडलेला चुन्याचा ढीग किंवा स्टॅलेग्माईटवर संशोधन केले. त्यातून पृथ्वीवर हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या लहानशा जलवायू घटनेचा शोध लागला. त्या घटनेनंतरच एक युग सुरू झाले तेच मेघालय युग आहे. ते आजतागायत सुरू आहे.
मेघालय युग खूप अद्वितीय आहे. कारण पृथ्वीच्या भूसंशोधन इतिहासातील हे पहिले युग आहे. पृथ्वीचा ४.६ अब्ज वर्षांचा इतिहास संशोधकांनी अनेक कालखंडात विभागला आहे. खंडांचे विभाजन, पर्यावरणातील नाटय़मय बदल, वनस्पती वा प्राणी यांच्या नव्या प्रजाती यावरून कालखंड ठरवण्यात आले आहेत. सध्या आपण ज्या कालखंडात राहतो त्या युगाला होलोसीन युग असे म्हटले जाते. यामध्ये ११,७०० वर्षांचा इतिहास सामावलेला आहे. वातावरणात झालेल्या नाटय़मय बदलामुळे आपण हिमयुगातून बाहेर पडलो तो हा काळ आहे.
भयंकर दुष्काळाने सुरुवात
संशोधकांच्या म्हणण्यानुसार होलोसीन युगाचेही विभाजन होऊ शकते. युवा मेघालय युग म्हणजे १९५० पासून आधीचा ४२०० वर्षांचा कालखंड. भयंकर दुष्काळाने या कालखंडाची सुरुवात झाली. दोन शतके या दुष्काळाचा प्रभाव होता. हिमयुगानंतर निर्माण झालेल्या कृषीआधारित समाजावर या दुष्काळाचे परिणाम दिसून आले. इजिप्त, ग्रीक, सीरिया, पॅलेस्टाइन, मेसोपोटामिया, इंडस खोरे, सिंधु खोरे, यांग्त्से नदी खोरे आदी अनेक ठिकाणच्या संस्कृतीवर परिणाम झाला.























































