स्कॉर्पिओ झाडाला आदळून तिघा तरुणांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर महामार्गावरील 15 दिवसांतील दुसरा भीषण अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्कॉर्पिओ जीप झाडाला धडकून तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. विजापूर रोडवरील 13 मैलाजवळ ही घटना घडली आहे. चौघेजण मंडप व लाइट डेकोरेशनचे कॉन्ट्रक्टर आहेत. गेल्या 15 दिवसांतील ही दुसरी घटना आहे. नुकतेच याच रस्त्यावर पुलावर कार आदळून कर्नाटकातील चौघा तरुणांचा मृत्यू झाला होता.

किशोर अण्णाराव भोसले (रा. सळई मारुती, उत्तर कसबा), नितीन भगवान भांगे (रा. निराळेवस्ती), व्यंकटेश राम म्हेत्रे अशी मृतांची नावे असून, राकेश हुच्चे हा गंभीर जखमी आहे.

नितीन भांगे हा मंडप कॉन्ट्रक्टर असून, किशोर भोसले, व्यंकटेश म्हेत्रे व राकेश हुच्चे हे तिघे लाइट डेकोरेशनचे काम पाहतात. हे चौघेजण कर्नाटकातील औरद येथे स्कॉर्पिओ कारमधून कामासाठी गेले होते. परतत असताना पहाटे 4च्या सुमारास तेरा मैलजवळील वकील वस्तीजवळ वेगात असलेली ही जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यात चौघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता किशोर भोसले, नितीन भांगे, व्यकटेश म्हेत्रे या तिघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर राकेश हुच्चे हा गंभीर जखमी आहे. या अपघाताची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

सोलापूर-विजापूर महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

सध्या सोलापूर-विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्याच आठवडय़ात विजापूर रोडवरील कवठे गावाजवळ बांधकाम सुरू असलेल्या पुलाला धडकून कर्नाटकातील चौघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. या नव्याने होत असलेल्या रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत. तसेच हत्तूरजवळील बायपासदेखील धोकादायक असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.