फोनला पासवर्ड ठेवायचा राहिला? मग ‘हा’ उपाय करा आणि खासगी डेटा सुरक्षित ठेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्मार्टफोन वापरणाऱ्यांना एका गोष्टीचा हमखास त्रास होतो. तो म्हणजे कामासाठी फोन मागून मग त्यात शोधाशोध करणाऱ्यांचा. फोन मागण्याच्या बहाण्याने अनेकदा काही जण आपले खासगी फोटो किंवा डेटा तपासण्याचे उद्योग करतात. त्यांना रोखण्यासाठी एक उपाय तुमच्या फोनमध्येच दडला आहे. विशेष म्हणजे, या उपायात पासवर्ड नसला तरी तुमचं काम होऊ शकतं.

बऱ्याचदा अनेक जण आपला फोन काहीतरी कामानिमित्त मागतात. अशा व्यक्ती तुमच्या जवळच्या किंवा नातेवाईकांपैकी कुणीतरी असतात. त्यामुळे तुम्हाला थेट नाही म्हणणं शक्य नसतं. अशा वेळी एक सोपा उपाय तुम्हाला मदत करू शकतो. तुमच्या फोनमध्येच काही सेटिंग करून तुम्ही हा उपाय वापरू शकता.

काय आहे हे सेटिंग?
तुमच्या फोनमध्ये Pin the Screen किंवा Screen Pinning नावाचा एक पर्याय असतो. या फीचरचा वापर केल्यास तुमचा फोन तुमच्या मर्जीशिवाय कुणीही वापरू शकणार नाही. हे फीचर अँड्रॉईड 5.0 आणि नंतरच्या सगळ्या व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
हे सेटिंग केल्यानंतर समजा कुणी तुमच्याकडे फोन करण्यासाठी तुमचा स्मार्टफोन मागितला. तर त्याला फक्त तुमच्या फोनमधील कॉलिंग हेच अॅप वापरता येईल. त्या व्यतिरिक्त तो कोणतंही अॅप्लिकेशन वापरता येणार नाही.

असं करा अॅक्टिव्हेट

  1. तुमच्या फोन सेटिंगमध्ये जा. तिथे Security & Lock Screen नावाचं फीचर दिसेल.
  2. तिथे क्लिक करा आणि त्यात तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यात सर्वात खाली Pin the Screen किंवा Screen Pinning असा पर्याय दिसेल, त्याला क्लिक करा आणि ते फीचर ऑन करा.
  3. फीचर ऑन केल्यानंतर तुम्हाला जे अॅप्लिकेशन वापरायचं असेल ते ओपन करून बंद करा.
  4. त्यानंतर Recent Apps मध्ये जा. तिथे तुम्हाला ते अॅप्लिकेशन पिन करण्याचा पर्याय दिसेल. नसल्यास तुम्ही ते अॅप्लिकेशन काही सेकंद दाबून ठेवल्यास देखील हा पर्याय दिसू लागतो. पिन करण्याचा पर्याय दिसल्यावर त्यावर क्लिक करा. त्यानंतर ते अॅप्लिकेशन पिन होईल.
  5. ज्याला कुणाला ते अॅप्लिकेशन वापरायचं असेल, त्याला तुमचा फोन द्या. तो फक्त तेच अॅप्लिकेशन वापरू शकेल. दुसऱ्या कोणत्याही अॅप्लिकेशनला त्याला जाता येणार नाही. किंवा फोटोंसारखा खासगी डेटाही तपासता येणार नाही.
  6. हे सेटिंग बंद करण्यासाठी बॅक आणि होम की एकत्र क्लिक करा. जेणेकरून ते अॅप्लिकेशन पुन्हा अनपिन होईल. मात्र, अनपिन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा नेहमीचा पासवर्ड टाकून मगच फोन सुरू करता येईल.