कामांची रखडपट्टी थांबणार, रेल्वेवरील पुलांसाठी आता सी-लिंकचा केबल फॉर्म्युला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेवरील पूल बांधण्यासाठी पालिका आता वांद्रे-वरळी सी-लिंकचा ‘केबल फॉर्म्युला’ वापरणार आहे. यामुळे पुलांच्या कामांची रखडपट्टी थांबणार असून जागाही वाचणार आहे. पहिल्या टप्प्यात दादरचा टिळक ब्रिज, भायखळा, घाटकोपर आणि रे रोडचा रेल्वे ब्रिज केबल पद्धतीने बांधण्यात येणार आहे. लवकरच या पुलांची कामे सुरू होणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे 350 पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे. मात्र रेल्वे हद्दीतील पूल नव्याने बांधताना किंवा दुरुस्ती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सॅण्डहर्स्ट रोड येथील हँकॉक असाच सहा वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे आता रेल्वे मार्गांवर वांद्रे- वरळी सागरी सेतूच्या धर्तीवर केबल स्टेड (केबल) पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर दादर येथील लोकमान्य टिळक पुलासह दक्षिण मुंबईतील चार पूल या पद्धतीने बांधण्यात येणार आहेत. ते बांधकाम महाराष्ट्र रेल इफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वे प्रशासनाकडून होणार असल्याची माहिती प्रमुख पूल अभियंता राजेंद्र तळकर यांनी दिली.

असा होणार फायदा

रेल्वे मार्गावर पूल बांधताना मोठमोठे पिलर उभारण्यात अडचणी येतात. पिलरवर गर्डर ठेवण्याचे दिव्यही पार करावे लागते. रेल्वे मार्ग आणि नजीकच्या मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असल्याने वाहतूककोंडी होते. नागरिक, प्रवाशांची गैरसोय होते. मात्र केबल ब्रिज उभारताना वेगाने काम होणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

तीन पुलांसाठी 730 कोटींचा खर्च

दादर येथील टिळक ब्रिज – 375 कोटी, रे रोड रेल्वे ब्रिज – 147 कोटी आणि भायखळा येथील रेल्वे ब्रिज 200 कोटी रुपये असा खर्च तीन ब्रिजसाठी केला जाणार आहे. शिवाय घाटकोपर येथे रेल्के मार्गाकरील पुलाचे बांधकामही केबल पद्धतीनेच केले जाणार आहे.

100 वर्षे जुने ब्रिटिशकालीन पूल

– दक्षिण मुंबईतील बहुतांशी रेल्वे ब्रिज ब्रिटिशकालीन असून 100 वर्षांहून अधिक जुने झाले आहेत. या पुलांचे आयुष्यही संपत आले असून रुंदी कमी असल्याने संबंधित ठिकाणी नेहमीच वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे ते नव्याने बांधण्याची कार्यवाही केली जात आहे.
– पालिकेने मुंबईच्या रेल्वे मार्गावरील 14 धोकादायक पुलांची यादी जाहीर करून गणेशोत्सवाच्या काळात पुलांवर गर्दी करू नये असे आवाहन भाविकांना केले आहे. 14 पैकी चार पूल सागरी सेतूच्या धर्तीवर बांधण्यात येणार आहेत.