
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पहिल्या लग्नाच्या घटस्फोटासंदर्भातील याचिका कोर्टात प्रलंबित असली तरी केलेले दुसरे लग्न हे वैध आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पहिल्या लग्नासंदर्भात सामंजस्याने विभक्त होऊन दोन्ही पक्षांनी घटस्फोटाची केस न लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांनाच हा निकाल लागू होईल, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
न्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायाधीश एल. नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटाविरुद्धची याचिका कोर्टात प्रलंबित असताना कोणताही पक्ष दुसरा विवाह करू शकत नाही, असे स्पष्टीकरण खंडपीठाने दिले. घटस्फोटाची केस पुढे न चालवण्यावर जोपर्यंत पक्षकारांमध्ये समझोता होत नाही तोपर्यंत घटस्फोटाविरुद्धची आव्हान याचिका प्रलंबित असेल तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम-15 अन्वये विवाह रोखता येणार नाही, असे आमचे मत असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्ट पतीच्या बाजूने
सध्या चालू असलेल्या खटल्यात घटस्फोटाविरुद्ध केलेले अपील प्रलंबित असतानाच्या काळात पतीने पहिल्या पत्नीशी समझोता करून घटस्फोटाची केस मागे घेण्यासाठी अर्ज केला. या दरम्यान पत्नीने दुसरे लग्न केले. परंतु उच्च न्यायालयाने हे लग्न अमान्य केले. परंतु सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द करून पतीच्या बाजूने निकाल दिला.
summary- second marriage is valid in pending divorce case
























































